कोळीपेठेतील सेंट्रल बॅकेच्या शिपायाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू ; हाथेडहून जळगावकडे दुचाकीवरुन परततांना घटना
जळगाव- दोन दिवसांची सुटी असल्याने जळगावला दुचाकीवरुन घराकडे परतत असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत किशोर शिवाजी ठाकूर वय 34 रा. कोळीपेठ या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास ममुराबादजवळ घडली. ठाकूर हे चोपडा तालुक्यातील हाथेड येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत शिपाई म्हणून नोकरीला होता. तेथून परतत असतांना हा अपघात झाला. द
शहरातील राममंदिर परिसरातील कोळीपेठ येथे किशोर ठाकूर कुटुंबासह वास्तव्यास होते. हाथेड येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत नोकरीला असल्याने अपडाऊन न करता त्याचठिकाणी भाडे करारावर खोली करुन राहत होते. आठवड्यातून दोन दिवस शनिवार, रविवार सुटीच्या दिवशी ते घरी येत असे.
पत्नीला म्हणाले ही निघालोय…पोहचतो
1 सप्टेेंबर रोजी रविवारी सुटी असल्याने शनिवारी सायंकाळी ड्युटी आटोपून त्यांच्या दुचाकीने (एम.एच.19 सी.एस 8962) जळगावकडे निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी सायंकळी साडेसहा वाजता पत्नीला फोन केला. फोनवर त्यांनी पत्नीला मी जळगावला येण्यासाठी निघालोय…पोहचतोय..असे सांगितले. जळगाव पोहचण्यापूर्वीच ममुराबाद ते विदगाव दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. फोनवरुन झालेले संभाषण हे पत्नीशी त्यांचे शेवटशे बोलणे ठरले.
बसचालकाने हलविले किनगाव रुग्णालयात
रस्त्यावरुन जात असलेल्या बसमधील चालकाला रक्ताच्या थारोळ्यात किशोर ठाकूर पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ बसमधून त्यांना किनगाव येथील रुग्णालयात हलविले. व ठाकूर यांच्याच मोबाईलमधील पत्नीच्या क्रमांकावर फोन करुन अपघाताची माहिती कळविली. यानंतर नातेवाईकांनी किनगाव गाठले. जखमी ठाकूर यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. पोहचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
एकुलत्या मुलावर काळाची झडप
किशोर ठाकूर याच्या पश्चात आई विमलबाई ,वडील शिवाजी पोपट ठाकूर तसेच पत्नी सपना, मुलगा सोहम, अडीच वर्षाची मुलगी सिध्दी असा परिवार आहे. दोन्ही बहिणी विवाहित असून किशोर हा एकुलता एक मुलगा होता. किशोर यांचे वडील शिवाजी ठाकूर हे सुध्दा नवीपेठेतील महाराष्ट्राच्या बँकेच्या मुख्य शाखेत शिपाई म्हणून नोकरीला आहे. किशोरच्या जाण्याने दोन्ही चिमुकल्यांचे पितृछत्र हरविले आहे. त्यांच्या रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.