पत्नीला मारुन वृध्दाची आत्महत्या

0

अमळनेर । तालूक्यातील रामेश्वर बुद्रुक येथील एका वृध्दाने दि 16 रोजी रात्री 9 ते 10 दरम्यान पत्नीच्या डोक्यात मुसळ मारुन खून करत स्वतः सकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गावात वातावरण शोकाकूल आहे. घटना उघडकीस आल्यानंतर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नेमके कशामुळे ही दुर्घटना घडली? याबाबत कोणतीही प्राथमिक माहिती समोर आलेली नाही.

घरी कुणी नसतांना केला घात
रामेश्‍वर ग्रामपंचायतीतील सेवानिवृत्त शिपाई रघुनाथ गंभीर पाटील (वय 66) हे आपली पत्नी अरुणाबाई रघुनाथ पाटील (वय 60) आणि मुलासह राहत होते. हे दोघे पति पत्नी दि 16 रोजी घरी असताना व मुलगा लग्नासाठी बाहेर गावी गेला असताना रघुनाथ पाटील यांनी रात्री 9 ते 10 दरम्यान पत्नी अरुणाबाई पाटील हिच्या डोक्यात मुसळीने मारुन जागीच ठार केले. या कृत्यानंतर रात्री घरात रक्त झाले होते ते कपडा व रद्दी पेपरने पुसून प्लास्टिक पिशवित भरून ठेवले. एवढेच नव्हे तर त्यांची पत्नीचा मृतदेह उचलून खाटेवर टाकला. त्यानंतर स्वतः विषारी औषध सकाळी 4 ते 5 दरम्यान प्राशन करुन घरात झोपुन राहिले. सकाळी उशिरापर्यंत कुणीही न उठल्यामुळे शेजार्‍यांना संशय वाटला. यानंतर ते घरात गेल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

परिसरात खळबळ
सदरच्या घटनेचे माहिती सर्वत्र पसरल्याने परिसरात खळबळ उडाली. दोन्ही मृतदेहांच्या शवविच्छेदन अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. याबाबत अमळनेर पोलिसात खबर देणार पोलिस पाटील रविंद्र पाटील यांच्या खबरीवरुन भादंवि कलम 302 प्रमाणे मयत रघुनाथ पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास वाघ हे करीत आहेत. मृत दाम्पत्याला दोन विवाहित मुली व एक मुलगा आहे.