नवी दिल्ली । पत्नी स्हणजे वस्तू नव्हे. पती आपल्या पत्नीला स्वतःसोबत राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, असे महत्त्वपुर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. एका महिलेने आपल्या पतीवर क्रूरतेचा आरोप केला होता, याबाबत फौजदारी खटला सुरू होता. या खटल्यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वरील मत स्पष्ट केले आहे.महिलेने केलेल्या आरोपात, ‘मी त्याच्यासोबत राहावे अशी पतीची इच्छा आहे, पण मला त्याच्यासोबत राहण्याची इच्छा नाहीये’ असं म्हटले होते. महिलेच्या आरोपावर सुनावणी करताना न्यायाधीश मदन बी लोकुर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने कोर्टाने पतीला फटकारले.
सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पतीला सुनावले खडे बोल
न्यायाधीश मदन बी लोकुर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने न्यायालयात उपस्थित असलेल्या पतीला, ‘पत्नी म्हणजे एखादी वस्तू नाहीये, तुम्ही तिच्यावर बळजबरी करू शकत नाही. तिला तुमच्यासोबत राहायचं नाहीये, तरीही तिच्यासोबतच राहायचे आहे, असे तुम्ही कसे काय म्हणू शकतात’ असा सवाल पतीला केला. पत्नीसोबतच राहाण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा असेही सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पतीला सुचवले आहे. या निर्णयामुळे अनेक पिडीत आणि त्रस्त महिलांना दिलासा मिळाला आहे. यापुढे कोणत्याही पत्नीला जबरदस्ती करता येणार नाही.