गुजरात उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा; लवकरच सुनावणार फैसला
अहमदाबाद : मुखमैथुनसाठी (ओरल सेक्स) पत्नीवर केलेली बळजबरी हा क्रूरतेने केलेला संभोग, वैवाहिक आयुष्यातील क्रूरता किंवा बलात्कार म्हणावा का, या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर गुजरात उच्च न्यायालय फैसला सुनावणार आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये पतीवर खटला चालवला जाऊ शकतो का? याबाबतही न्यायालय निर्णय देणार आहे. यासंदर्भात न्यायालयाने राज्य सरकारकडे उत्तर मागितलेले आहे.
काय आहे प्रकरण?
मुखमैथुनसाठी जबरदस्ती करत असल्याची तक्रार पत्नीने पतीविरोधात केली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पती-पत्नी असल्याने शोषण अथवा बलात्कार होऊ शकत नाही, अशी बाजू त्याने न्यायालयात मांडली होती. तसेच आपल्यावरील आरोप हटवण्यात यावे, अशी मागणीही याचिकेद्वारे केली होती. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकारकडे उत्तर मागितले आहे. तसेच तक्रारकर्त्या पत्नीला नोटीस पाठवली आहे. अनैसर्गिक संबंधांप्रकरणी पत्नी आपल्या पतीविरोधात कलम 377 अंतर्गत तक्रार दाखल करू शकते का? मुखमैथुनसाठी जबरदस्ती केली जात असेल तर कलम 377 किंवा क्रूरतेसाठी कलम 498 अ अंतर्गत गुन्हा मानला जाऊ शकतो का? किंवा कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा ठरू शकतो का? आदी प्रश्नांची उत्तरे न्यायालयाने सरकारकडे मागितली आहेत. वैवाहिक बलात्काराच्या घटना देशात घडत असून, त्या निंदनीय आहेत. यामुळे विवाहसंस्थेवरील विश्वासाला मोठा धक्का बसू शकतो, अशी चिंताही न्यायालयाने व्यक्त केली. दरम्यान, वैवाहिक बलात्काराच्या व्याख्येवरही न्यायालय चर्चा करणार आहे.