मुंबई : सोशल नेटवर्किंग वेबसाइट ट्विटरवर पत्नीसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीच्या पेहरावावर काही कट्टरपंथीयांनी टीका केली होती. त्यानंतर शमीने आता पुन्हा एकदा पत्नीसोबतचा नवा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. नववर्षाच्या शुभेच्छा देत शमीने पत्नीसोबतचा नवा फोटो शेअर केला आहे. शमीने कवितेच्या माध्यमातून नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सुंदर ओळींसह दिल्या शुभेच्छा
कट्टरपंथियांनी शामीच्या पत्नीने घातलेल्या कपड्यांवरुन शामीला लक्ष्य करत पत्नीला झाकून ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र शामीने अजून एक फोटो शेअर करत आपल्याला अशा टिकेचा काही फरत पडत नसल्याचे दाखवून दिले आहे. फोटोसोबत “न साथी है, न हमारा है कोई. न किसी के हम है, न हमारा है कोई. पर आपको देख कर, कह सकते हैं एक प्यारा हमसफर है कोई. नववर्ष की शुभकामनाएं.” या सुंदर ओळीदेखील त्याने शेयर केल्या आहेत. शमीची पत्नी हसीन जहाँ हिच्या पेहरावावरुन कट्टरपंथीयांनी बरीच टीका केली होती. इतकंच नव्हे तर तिला हिजाब घालण्याचा फुकट सल्लाही त्यांनी दिला होती. त्यानंतर शमीने ट्विटरवरुन आपल्या खास शैलीत उत्तर दिले होते.
सोशल मीडियावर वादंग
गेल्या आठवड्यात मोहम्मद शमीने आपली पत्नी हसीन जहान हिच्यासोबतचा एक फोटो आपल्या फेसबूक पेजवर पोस्ट केला होता. मात्र या फोटोमुळे त्याला अद्यापही नसता मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्या फोटोत शमीची पत्नी हसीनने एक चॉकलेटी कलरचा सुंदर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. स्लिव्हलेस प्रकारच्या या ड्रेसवरील नक्षी तसेच हसीनच्या गळ्यातील नेकलेसमुळे ती अतिशय सुंदर दिसत आहे. मात्र, तिचे हेच सौंदर्य काही कट्टर नेटिझन्सना बोचत असल्याचे फोटोखालील कमेंट्सवरून दिसून येत आहे. त्याचसोबत या फोटोवर कमेंट करणाऱ्यांचे दोन गट पडले असून ते एकमेकांचा विरोध करताना दिसत आहेत.
समर्थनार्थ अनेकजण
या फोटोवर वादंग उठल्यावर खुद्द मोहम्मद शमीने टीकाकारांना चांगलेच झोडपून काढले आहे. इतकेच नाहीतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने शमीच्या फोटोचा स्क्रीनशॉट ट्वीट करुन त्याला समर्थन दिले आणि धर्माच्या नावाने बोंबा मारणाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. देशात आणखी मोठे मुद्दे आहेत. आशा करतो की, कमेंट करणाऱ्यांची समज वाढेल, अशा शब्दात मोहम्मद कैफने शमीच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना झोडपले आहे.