पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातूनच काढला भाचाचा काटा

0

चारठाणा खुनाची मुक्ताईनगर पोलिसांकडून उकल ; आरोपीला मामाला अटक

मुक्ताईनगर- पत्नीचे भाच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय बळावल्याने भाच्याला अद्दल घडवण्यासाठी मामानेच खाटेखाली जिलेटीन कांड्यांचा स्फोट घडवत झोपलेल्या 22 वर्षीय आकाश वरखेडेची हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणाचा गुंता मुक्ताईनगर पोलिसांनी उकलला असून आरोपी व नात्याने मामा असलेल्या जनार्दन रामधन विटोकार
यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयाने पछाडले
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार मयत आकाशचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी जनार्दनला होता व या कारणातून त्याची पत्नी मुलांना घेवून माहेरी निघून गेली होती. आपल्या संसारात भाचा हाच वितुष्ट आणत असल्याने त्याला अद्दल घडावी यासाठी आरोपी जनार्दनने गुरुवारी मध्यरात्री तो अंगणात झोपल्याची संधी साधून त्याच्या खाटेखाली जिलेटीन कांड्या ठेवल्या व इलेक्ट्रीक सप्लाय देवून स्फोट घडवून आणला. या घटनेत त्याचा पाय निकामी होईल व त्याला अद्दल घडेल, असा कयास मामाला असतातरी स्फोटाची भीषणता इतकी होती की मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाला. दरम्यान, शुक्रवारी आरोपीची उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास शनिवारी अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.