पिंपरी-चिंचवड : पत्रकबाजी करून टीका काय करता, हिंमत असेल तर एका व्यासपीठावर या, तेथे आमने-सामने आपआपल्या कामाचा लेखाजोखा मांडू, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांना शुक्रवारी दम भरला. कालच आ. जगताप यांनी पत्रक काढून खा. बारणे यांच्यावर टीकेची झोड उठविली होती, त्याला खा. बारणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. रोज उठून जनतेची करमणूक करण्याची माझी मानसिकता नाही. मला मावळच्या जनतेने विकासकामांसाठी निवडून दिले आहे. मी काय विकासकामे केलीत ते 2019च्या निवडणुकीपूर्वी मतदार जनतेला सांगेल, यापुढे पत्रकबाजी न करता एका व्यासपीठावर आमने-सामने या. कामाचा व राजकीय परिपक्वतेचा लेखाजोखा मांडण्याची माझी तयारी आहे. लक्ष्मण जगताप यांचा 17 वर्षे नगरसेवक, 13 वर्षे आमदारकीचा कालावधी आणि माझा 20 वर्षे नगरसेवक आणि तीन वर्षे खासदारकीचा कालावधी, या कालावधीत केलेली कामे आपण जनतेसमोर ठेवू, अशा शब्दांत खा. बारणे यांनी आ. जगताप यांना आव्हान दिले आहे. आता हे आव्हान आ. जगताप स्वीकारतात का, याकडे पिंपरी-चिंचवडवासीयांचे लक्ष लागले आहे.
भाजपप्रवेशाच्या बातम्या पसरविणारा चेहरा उघड झाला!
आ. जगताप यांच्या पत्रकबाजीने संतप्त झालेल्या खा. श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी अगदी निर्वाणीचा इशारा देणारे पत्रक प्रसिद्धीस दिले. या पत्रकात ते नमूद करतात की, आ. लक्ष्मण जगताप यांचा सतरा वर्षे नगरसेवक व तेरा वर्षे आमदारपदाचा कालावधी आणि माझा वीस वर्षे नगरसेवक व तीन वर्षे खासदारपदाच्या कारकिर्दीतील कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर व मीडियाच्या प्रतिनिधीसमोर मांडण्याची माझी तयारी आहे, त्यावेळेसच मावळची जनता निर्णय घेईल की मी 2019 च्या लोकसभेत पुन्हा उगवतो का मावळतो, असा टोलाही खा. बारणे यांनी लगावला. तसेच यापुढे अशा फालतू पत्रकबाजीला पुन्हा उत्तर देणार नसल्याचेही त्यांनी ठणकावले. खा. बारणे म्हणाले, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचा खासदार म्हणून काम करतो, मला मीडियाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाबाबत या अगोदरच उत्तर दिले आहे. त्यामुळे आयर्यागयर्याच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही. माझ्या भाजप प्रवेशाच्या खोट्या बातम्या मागचा खरा चेहरा आ. जगताप यांच्या पत्रकबाजीने उघड झाला आहे. स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या नावाने माझ्याविरोधात आजपर्यंत पत्रकबाजी करून माझी भाजप प्रवेशाची बातमी पसरवून व्यक्तिगत बदनामी करण्याचा चंग बांधलेल्या आमदाराला मी पुन्हा खासदार होणार हे स्वप्नातही दिसू लागल्याने त्यांचे पित्त खवळले असून, लोकप्रतिनिधीला न शोभणारी भाषा ते बोलू लागले आहे, अशी घणाघाती टीकाही खा. बारणे यांनी केली.
वाल्हेकरवाडीतून पोलिस बंदोबस्तात पळाले हे विसरले का?
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मोदी लाटेत मिळालेल्या सत्तेने उन्मत्त झालेल्या या नेत्याने गरीब माणसांना उद्ध्वस्त करून त्यांच्या घरावर नांगर फिरवण्याचे कृत्य आखल्याने वाल्हेकरवाडी येथील मेळाव्यात पोलिस बंदोबस्तात पळ काढावा लागला, हे ते विसरले असतील. सहा महिन्याच्या सत्तेच्या कारभारात कर्मचारी, अधिकारी, ठेकेदार यांना केवळ वेठीस धरले नाही तर आ. जगतापांचा किती ताप भाजपच्या निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना होऊ लागला आहे, हा आपला कारभार पिंपरी-चिंचवडची जनता पाहते आहे, असे टीकास्त्र डागत खा. बारणे म्हणाले, संसदेतील उत्कृष्ठ काम करणार्या खासदारांना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या आयआयटी चेन्नई व प्राईम पॉईंट फाउंडेशन यांच्यावतीने केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरून अधिकृत माहिती घेऊन हा पुरस्कार दिला जातो. माझ्या संसदेतील कामगिरीबद्दल सलग गेली तीन वर्षे पुरस्कार मिळाला आहे. त्या संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आ. जगताप यांनी संस्थेबद्दलची माहिती घ्यावी, या संस्थेच्या पुरस्कार कमिटीचे अध्यक्ष लोकसभेतील भाजपचे प्रतोद व केंद्रीयमंत्री अर्जुन मेघवाल व सदस्य म्हणून भाजपचे केंद्रीयमंत्री हंसराज आहिर आहेत, हेही लक्षात घ्यावे. ज्यांच्याहस्ते मला पुरस्कार दिला ते देशाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते, अराजकीय व्यक्ती असलेले ते केरळ राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांची नियुक्ती मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेली आहे. आपण माझ्यावर आरोप करीत नसून, आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहात. त्यामुळे तुम्हाला भाजप तीन वर्षात किती समजला हे काळच ठरवेल. आत्तापर्यंत संसदरत्न पुरस्कार मिळालेले आणि वरिष्ठ भारतीय जनता पक्षाचेदेखील खासदार आहेत, त्यांनीदेखील हा पुरस्कार पैसे देऊन मिळवला आहे? का हे जगतापांनी त्यांना विचारावे, असा टोलाही आ. जगतापांच्या आरोपांवर खा. बारणे यांनी लगाविला.
माझा विजय निश्चित म्हणून आ. जगतापांना पोटसूळ!
खासदार बारणे म्हणाले, 2009 च्या विधानसभेत आपला विजय कसा झाला, हे स्वतःच्या अंतर्मनात झाकून पहा. बोगसगिरीच्या आधारावर विजय मिळाल्यानेच आपण राष्ट्रवादीसोडून भाजपच्या आश्रयाला मोदी लाटेत गेला; कारण 2014 च्या निवडणुकीपूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दुबार व बोगस एक लाखापेक्षा जास्त मतदार वगळण्यात आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याने आ. जगतापांच्या पोटात पोटसूळ उठल्याने ते पत्रकबाजीचा आधार घेत आहेत, असा घणाघाती आरोप करत, माझ्या कामाची होत असलेली प्रसिद्धी व वृत्तपत्रातून येणार्या बातम्या, लोकसभेतील कामकाजाची केंद्र सरकारच्या लोकसभा चॅनलवरून होणारी प्रसिद्धी; तसेच केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री मला विकासकामासाठी करत असलेल्या सहकार्यामुळे आ. जगताप यांचा तीळपापड होत आहे, अशी टीकाही खा. बारणे यांनी केली.