पत्रकारांमध्ये सत्ता उलथवून टाकण्याची ताकद

0

शिक्रापूर । पत्रकारीता हा देशातील चौथा स्तंभ असून पत्रकारांमध्ये एखादी सत्ता स्थापन करण्याची तसेच एखादी सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते, असे तहसीलदार रणजीत भोसले यांनी सांगितले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने शिरूरच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने अभिवादन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

प्रशालेमध्ये सकाळी व्यसन मुक्तीवर प्राध्यापक संदीप महानडुळे यांचे व्याख्यान झाले. तसेच या निमित्ताने शालेय चित्रकला व निबंध स्पर्धांचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, दत्तात्रय गिरमकर, जयश्री भुजबळ, रामभाऊ सासवडे, सुजाता खैरे, गीता चव्हाण आदींसह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.

मोठा अनर्थ टळला
गेले सात दिवस संपूर्ण देशाचे लक्ष या शिरूर तालुक्याकडे लागलेले होते. येथे उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांनी योग्य प्रकारे वार्तांकन केल्यामुळे मोठा अनर्थ टाळता येऊ शकला. पत्रकारीता हे भविष्यकाळासाठी एक उत्तम पर्याय असून विद्यार्थ्यांनी या करीयरचा निश्‍चितच विचार केला पाहिजे, असे भोसले यांनी पुढे सांगितले. प्रशालेचे उपमुख्यध्यापक आर. टी. शिंदे यांनी प्रस्तावना केली तर गणेश मांढरे यांनी आभार मानले.