पत्रकाराची मोटारसायकल चोरणारा पोलीसांच्या ताब्यात

0

24 तासात आरोपीला पकडण्यात चाळीसगाव शहर पोलीसांना यश

चाळीसगाव । वृत्तसंकलन करण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गेलेल्या पत्रकाराची मोटारसायकल 11 मार्च 2018 रोजी सकाळी 10.45 ते 12 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या बाहेरुन अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. चाळीसगाव शहर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तपासाची चक्रे फिरवत 24 तासाच्या आत आरोपीला मोटारसायकलसह शहरातील नागद रोडवरुन ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी, दैनिक जनशक्तीचे सूर्यकांत कदम (रा. किसनराव जोर्वेकर, नगर टाकळी प्र.चा.त चाळीसगाव) हे 11 मार्च 2018 रोजी सकाळी 10.45 वाजता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन समोर त्यांची विना नंबरची काळा रंग लाल पट्याची 30 हजार रुपये किंमतीची होंडा शाईन मोटारसायकल लावुन वृत्तसंकलनासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गेले होते. वृत्तसंकलन झाल्यानंतर ते 12 वाजेच्या सुमारास त्यांनी मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी गेले असता त्यांची मोटारसायकल त्याठिकाणी दिसली नाही त्यांनी शोध घेतला असता मोटारसायकल मिळुन आली नाही म्हणुन त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेची माहिती पोनि रामेश्‍वर गाडे पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ आरोपीस शोधण्याचे आदेश दिल्यावर पोलीसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली. वरील वर्णनाची मोटारसायकल नागद रोडवर दिसल्याची गोपनीय माहिती डी.बी.चे हवालदार बापुराव भोसले, पो.कॉ.गोवर्धन बोरसे यांना मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक रामेश्‍वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापुराव भोसले, पो.ना. प्रेमसिंग राठोड, पो.कॉ.गोवर्धन बोरसे, गोपाल बेलदार, नरेंद्र नरवाडे, तुकाराम चव्हाण, हितेश चिंचोरे, संदीप पाटील, भगवान माळी यांनी शहरातील नागद रोडवर सापळा रचुन आरोपी पोपट दगा कुमावत (वय-30) रा. बेलदारवाडी ता.चाळीसगाव यास वरील चोरुन नेलेली मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. आरोपीची चौकशी सुरु असुन त्याच्या कडुन अजुन चोरलेल्या मोटारसायकल मिळण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे तपास बापुराव भोसले करीत आहेत.