नागपुरातील धक्कादायक घटना
नागपूर : नागपूर टुडे या वेब पोर्टलचे क्राइम रिपोर्टर रविकांत कांबळे यांच्या आई व मुलीची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड रोड परिसरात एका महिलेचा आणि छोट्या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. हे मृतदेह रविकांत कांबळे यांच्या आई आणि मुलीचेच असल्याचे तपासात स्पष्ट झाले. कांबळे यांची आई आणि मुलगी शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होत्या. या दोघींचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच गेल्या तीन वर्षात चोरी, लूटमार, खून, बलात्कार, कैदी पळून जाणे यांसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते आहे.
मृतांच्या अंगावरील दागिने गायब
उषा सेवकदास कांबळे असे कांबळे यांच्या आईचे नाव असून राशी रविकांत कांबळे मुलीचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळपासून या दोघीही बेपत्ता होत्या. त्यानुसार रविकांत कांबळे यांनी पोलिसांत त्या दोघी हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. फेसबुकवरही रविवारी सकाळी त्यांनी दोघींचा फोटो पोस्ट करून मदतीचे आवाहन केले होते. रविकांत कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिस या दोघींचा शोध घेत होते. त्यांना उमरेड रोड परिसरातच गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत आजी आणि नातीचा मृतदेह सापडला. उषा सेवकदास कांबळे यांच्या अंगावरचे दागिने गायब झाले आहेत. तसेच त्यांच्याजवळचे पैसेही लंपास करण्यात आले आहेत. लुटीच्या उद्देशाने अपहरण करून या दोन हत्या करण्यात आल्या असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलिस आता अधिक तपास करत आहेत. मात्र या धक्कादायक घटनेमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरले आहे.