पत्रकारिता उद्दिष्टापासून ढासाळली : पुरुषोत्तम सांगळे

0

राज्य पत्रकार संघाचे 12 वे अधिवेशन उत्साहात

पिंपरी-चिंचवड : ज्या हेतूने पत्रकारिता करणे अपेक्षित आहे, तो हेतू आता साध्य होत नाही. या क्षेत्रात कमालीची व्यावसायिकता आली असून, आपण आपला आत्मा विकून बसलो आहोत, आजची पत्रकारिता ही मूळ उद्दिष्टापासून ढासाळली आहे, अशी खंत दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनी व्यक्त केली. राज्य मराठी पत्रकार संघाच्या 12 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन भोसरीतील रामस्मृती लॉन्स येथे करण्यात आले होते. यावेळी आयोजित ‘माध्यमांचे बदलते स्वरुप’ या विषयावर भूमिका मांडताना श्री सांगळे बोलत होते. राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा माने हे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. तर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशीदास भोईटे, मिरर टाईम्स नाऊचे वृत्तसंपादक मंदार फणसे यांनीही या चर्चासत्रात सहभाग घेतला.

वेश्यांनाच पतीव्रता म्हणून आपण खपवित आहोत!
एक काळ असा होता की वृत्तपत्रे ही संपादकांच्या नावाने ओळखली जात होती, खरे तर तो पत्रकारितेचा सुवर्णकाळच होता, असे सांगून पुरुषोत्तम सांगळे म्हणाले, आजची परिस्थिती अशी आहे, की वृत्तपत्रे संपादकांच्या नावाऐवजी मालकांच्या नावाने ओळखली जात आहेत. धंदा करणे आणि मालकाला नफा कमावून देणे हेच पत्रकारांचे आणि संपादकांचे उद्दिष्ट बनले आहे. प्रबोधन करणे, माहिती देणे आणि मनोरंजन करणे ही मूळ उद्दिष्टेच आपण विसरून बसलो आहोत. जे खपते तेच विकावे लागत असून, मालकाला ‘बिझनेस’ देताना पत्रकारांना राजकारणी, आणि उद्योगपतींच्या पुढे लाळघोटावी लागत आहे, ही अत्यंत दुर्देवी अशी परिस्थिती आहे. भूमिका बनविणे आणि समाजभान जागे करण्याऐवजी आपण पेडन्यूज आणि राजकारणी मंडळींचा उदोउदो करण्यात धन्यता मानत आहोत. पतीव्रतेच्या बाजारात वेश्यांनाही पतीव्रता म्हणून खपविण्याचे पाप आजची पत्रकारिता करत आहे, असे रोखठोक मतही पुरुषोत्तम सांगळे यांनी मांडले. यावेळी राज्य संघटक संजय भेकरे, प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नितीन शिंदे, उपाध्यक्ष संतोष शिंदे, सचिव संजय जगदाळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रश्‍न उपस्थित करण्याचा हक्क अबाधित : तुळशीदास भोईटे
व्यावसायिक स्पर्धेत पत्रकारितेत बदल होत असले तरी, पत्रकारांनी मनोध्येय गमाविण्याची गरज नाही, असे सांगून ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे संपादक तुळशीदास भोईटे यांनी प्रश्‍न उपस्थित करण्याचा पत्रकारांचा हक्क आजही अबाधित असल्याचे सांगितले. ‘प्रसारमाध्यमांचे बदलते स्वरुप’ या विषयावरील परिसंवादात ते आपली भूमिका मांडताना बोलत होते. श्री भोईटे म्हणाले, की पत्रकारितेत आपण समजत आहोत, इतकेही काही वाईट दिवस आलेले नाहीत. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आजही पत्रकारच करत आहेत. जीवाची बाजी लावून आपण घोटाळेही बाहेर काढत आहोत. त्यामुळे पत्रकारिता आजही पुरेशी सक्षम असल्याचे दिसून येत आहे. पत्रकारांनी आता स्वतःला बदलविले पाहिजेत. टेक्नोसॅव्ही झाले पाहिजेत, आपल्या कामाचा वेग प्रचंड वाढला असून, तंत्रज्ञानाच्या या युगात आपण तंत्रकुशल झालो नाहीत, तर काळाच्या ओघात आपण बाद ठरू, अशी सार्थ भीतीही तुळशीदास भोईटे यांनी व्यक्त केली. जोपर्यंत आपण नैतिकतेने पत्रकारिता करत आहोत, तोपर्यंत लोकशाहीचा हा चौथास्तंभ मजबुतीनेच उभा राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

याप्रसंगी मंदार फणसे, लोकमंथन वृत्तपत्र समूहाचे संपादक अशोक सोनवणे यांनीही आपली भूमिका मांडली. राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे यांनी पत्रकारांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत उहापोह केला. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही पत्रकारांना मोलाच्या सूचना करून मार्गदर्शन केले.