पत्रकारितेचा यज्ञकुंड : अण्णा बेटावदकर

0

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा 2016चा जीवन गौरव पुरस्कार कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार विनायक प्रल्हाद उर्फ अण्णा बेटावदकर यांना जाहीर झाला आहे. विलास मुकादम, प्रवीण पुरो आणि महेश पावसकर यांच्या पुरस्कार समितीने अण्णांच्या नावाची शिफारस केली आहे. सदानंद खोपकर यांच्या सूचनेवरून हे पुरस्कार सुरू झाले. वसंतराव (दादा) देशपांडे समितीने उपयुक्त सूचना केल्या. किन्हवली, शहापूरच्या आप्प्पा (भानुशाली) यांच्या कारकिर्दीत कल्याणच्या अण्णांंना(बेटावदकर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येत आहे हा अपूर्व योगायोग म्हणावा लागेल. सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन!

शिवरायांनी सुभेदारांच्या सुनेची खणानारळाने ओटी भरून सन्मानाने पाठवणी केली. त्या महाराजांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेले कल्याण! दुर्गाडी किल्ला जिथे आहे ते कल्याण!! याच कल्याणात फुटपाथ पार्लमेंट चालवणारे प्रल्हाद नागेश उर्फ बाबा (बबनराव) बेटावदकर आणि गोदावरी तथा गोदुमाई बेटावदकर यांच्या पोटी 75 वर्षांपूर्वी विनायकाने जन्म घेतला. कल्याणात बाबा बेटावदकर, पाटील, श्याम मोहिते परिवारांनी राष्ट्र सेवा दलाला बाळसं धरायला लावलं.

11 जून 1966 रोजी साने गुरुजी पुण्यतिथीच्या दिवशी वसंतराव त्रिवेदी यांनी अंबरनाथला आहुति नावाचं साप्ताहिक सुरू केलं. आहुतिचे सहसंपादक प्र. ना. उर्फ बाबा बेटावदकर होते. आहुतिमधून पत्रकारिता करता करता विनायक बेटावदकर उर्फ अण्णा हे मुंबईच्या पत्रकारितेच्या सागरात झेपावले. राष्ट्र सेवा दल, कलापथक, सानेगुरुजी कथामाला याबरोबर अण्णा बेटावदकर हे कल्याणहून मुंबईच्या नवाकाळमध्ये काम करू लागले. निळुभाऊ खाडीलकरांच्या त्या वेळच्या नवाकाळमध्ये अण्णा स्थिरावले होते इतकेच नव्हे, तर क्राइम रिपोर्टिंगचा बेताज बादशाह बनले होते. चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सीएच्या परीक्षेत फार कमी मुले त्या काळी पास होत होती. या परीक्षेचे पेपर्स शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात छापायला यायचे. या पेपर्स फोडण्याचे रॅकेट कार्यरत होते आणि त्याचा पर्दाफाश अण्णांनी संध्याकाळमधून केला. खळबळ माजली आणि मुद्रणालयाच्या व्यवस्थापकाची बदली झाली, अशी अनेक प्रकरणे अण्णांनी उघडकीस आणली. विधायक पत्रकारिता कशी असावी याचे अण्णा हे खरे मार्गदर्शक होते. नवाकाळच्या सेवेनंतर अण्णांनी कल्याणात पत्रकारितेचे वर्ग सुरू केले. समाजाला मार्गदर्शन दिशा दिग्दर्शन करण्याचे काम सुरू होते.

अण्णा बेटावदकर यांनी पत्रकारितेचे जसे स्वतंत्र विद्यापीठ चालविले तद्वतच कल्याणला त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करून आपला मजबूत ठसा उमटवला. कौटुंबिक संकटांचा सामना करून अण्णांनी नवाकाळ उभा केला. सकाळपासून प्रहार करता करता त्यांनी लोकमतही घडवले. कल्याणच्या या लाल बहाद्दूर शास्त्री सम वाटणार्‍या झुंझार पत्रकाराने हा हां म्हणता वयाची 75 वर्षे पूर्ण केली अण्णा 75वर्षांचे झाले, यावर कुणाचा विश्‍वासच बसणार नाही, पण आपल्या आयुष्याच्या यज्ञकुंडात समिधा टाकून आहुती देत देत समाजसेवेचा, पत्रकारितेचा यज्ञकुंड अण्णांनी धगधगता ठेवला आहे. अण्णांना पत्नी प्रभावतींनीपण मोलाची साथ दिली. राम, श्याम, रमेश या भावंडांच्या वियोगानंतरही इदम न ममचे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी अण्णा झटताहेत. भगिनी बेबीचीसुद्धा मोलाची साथ मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराज! ज्या राजाने स्वाभिमान शिकवला, ताठ बाण्याने, स्वतंत्र अस्मिता जपण्याची, जगण्याची शिकवण दिली. ज्या सत्पुरुष महापराक्रमी शिवरायांनी सुभेदारांच्या सुनेची खणानारळाने ओटी भरून सन्मानाने पाठवणी केली. त्या महाराजांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेले कल्याण! दुर्गाडी किल्ला जिथे आहे ते कल्याण!! याच कल्याणात ’फुटपाथ पार्लमेंट’ चालवणारे प्रल्हाद नागेश उर्फ बाबा (बबनराव) बेटावदकर आणि गोदावरी तथा गोदुमाई बेटावदकर यांच्या पोटी 75 वर्षांपूर्वी विनायकाने जन्म घेतला.

1960 च्या दशकात कल्याण शहरात राष्ट्रसेवा दल, समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ यांचं प्राबल्य होतं. कृष्णराव धुळप हे कल्याणचे, ज्यांनी विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून समर्थपणे भूमिका बजावली. भगवानराव जोशी जनसंघाचे, त्यांनी कल्याणचे नगराध्यक्ष पद भूषवले. प्रा. राम कापसेही जव्हारहून कल्याणला येऊन स्थायिक झाले. याच कल्याणात बाबा बेटावदकर, पाटील, श्याम मोहिते परिवारांनी राष्ट्र सेवा दलाला बाळसं धरायला लावलं. राष्ट्र सेवा दलाचं कलापथक ही झक्कासपैकी चालत होतं. विविध कार्यक्रमांची विधायक कामांची रेलचेल होती. कुणामध्येही वैर भावना, द्वेष भावना नव्हती.

आता अण्णांना शतक महोत्सवी होण्याचे भाग्य मिळो आणि ते पाहण्याची संधी आम्हाला मिळो. यासाठी ठणठणीत आरोग्यही प्राप्त होवो हीच मनोकामना.

योगेश वसंत त्रिवेदी
9892935321