पत्रकारितेत बातमी लेखनात आकलन महत्त्वाचे

0

* मू.जे. महाविद्यालरात गेस्ट लेक्चरांचे मत
जळगाव । पत्रकारिता करतांना बातमी लेखनात आकलनाला महत्व असून त्यासाठी सर्वांगीण अभ्यास महत्वाचा आहे तसेच पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःपासून सुरुवात करावी, असे मार्गदर्शन वक्त्यांनी गेस्ट लेक्चर म्हणून केले. मू.जे.महाविद्यालयातील जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विभागात शनिवारी पर्यावरण संवाद या विषयावर पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा.डॉ.किरण पवार आणि बातमी लेखन व दक्षता या विषयावर जेष्ठ पत्रकार मनोज बारी यांचे ’गेस्ट लेक्चर’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी विभाग प्रमुख प्रा. विश्‍वजित चौधरी उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ.पवार म्हणाले की, पर्यावरण रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. देशात अनेक प्रकारचे प्रदूषण वाढत असून ते कमी करण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करावी. पाणी वाचविणे, वाहनांची पीयूसी करणे, रेन वोटर हार्वेस्टिंग असे विधायक पर्याय नागरिकांनी वापरले तर पर्यावरण समतोल राहून देश समृद्ध होईल, असेही ते म्हणाले. जेष्ठ पत्रकार मनोज बारी यांनी सांगितले की, बातमीलेखन करताना भाषा शैली उत्तम असली पाहिजे. ती शुद्ध देखील हवी. पत्रकार हा सर्वज्ञानी असतो असे नसून तो सातत्याने शिकत असतो. बातमीची अलंकारिता याला वृत्तपत्रात महत्वाचे स्थान असून ती सरावातून शिकण्यावर भर दिला पाहिजे असे सांगून त्यांनी बिट पत्रकारिता, मथळा लेखन, दैनिकांची डेडलाईन अशा विषयी देखील सविस्तर माहिती दिली. बातमी लेखन करताना घ्यावयाच्या दक्षता देखील त्यांनी सांगितल्या. विद्यार्थ्यांनी प्रश्‍नोत्तरांच्या स्वरुपात संवाद साधला. यावेळी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन खर्डे व आभार निलेश अहेर यांनी केले.