मुंबई । देशातील आघाडीच्या पत्रकारांपैकी एक असलेल्या गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतल्या कार्टर रोड येथेही संध्याकाळी 6 वाजता पत्रकारांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी पत्रकारांवरील हल्ले सहन करणार नसल्याचे निषेध फलक झळकावण्यात आले. यावेळी पत्रकारांनी कँडल मार्च काढला.
देवरांकडून हिंदुत्ववादी लक्ष्य
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कट्टर हिंदूत्ववाद्यांवर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी निशाणा साधला आहे. नावात सेना किंवा फौज असलेल्या पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी, अशी मागणी देवरांनी केली आहे.‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची मंगळवारी संध्याकाळी राहत्या घरी हत्या करण्यात आली. गौरी लंकेश या देशातील असहिष्णुता आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादाच्या प्रखर विरोधक होत्या. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली.