श्रीरामपूर: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते भाजप-शिवसेनेत गेले आहे. आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, पद्मसिंह पाटील हे देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान याबाबत एका पत्रकाराने श्रीरामपूरमध्ये पत्रकार परिषदेत, पक्षातील इतर नेते तुम्हाला सोडून जात आहेत इतपर्यंत ठीक होते मात्र तुमचे नातेवाईक पद्मसिंह पाटील हे देखील तुम्हाला सोडून चालले आहे असा प्रश्न विचारताच शरद पवार चांगलेच भडकले. राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध? तुम्ही चुकीचे बोलत आहात, असे बोलणार असाल तर मी पत्रकार परिषदेतून जातो असे म्हणत खुर्चीवरून उठले. माफी मागा, राजकारण आणि नातेवाईक यांचा काय संबंध? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आणि ते पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. इतक्यात त्यांना इतर पत्रकारांनी बसवलं आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत बसण्यास सांगितले. एवढेच नाही तर शरद पवार यांनी माझ्या पत्रकार परिषदेला अशा पत्रकारांना बोलवत जाऊ नका, ज्यांना सभ्यता नाही अशा लोकांना बोलवत जावू नका, बोलविणार असाल तर मला बोलवू नका अशा शब्दात संताप व्यक्त केला.
विकासाची वाट धरुन आम्ही राष्ट्रवादी सोडतो आहोत असे नेते सांगत आहेत, असं सांगून राष्ट्रवादी सोडणारे नेते हे विसरुन गेले आहेत की इतकी वर्षे त्यांचा विकास राष्ट्रवादीमध्ये असतानाच झाला. आता सेना भाजपाने त्यांना कोणत्या विकासाची वाट दाखवली म्हणून ते तिकडे जात आहेत ते कळू शकलेलं नाही असाही टोला शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना लगावला.