पत्रकार लंकेश यांच्या हत्येचा स्वराज अभियानतर्फे निषेध

0

पिंपरी-चिंचवड : सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी आपली लेखणी चालविणार्‍या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी (दि.5) कर्नाटकातील, बंगळूरूमध्ये गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा ‘स्वराज अभियान’ महाराष्ट्रच्या वतीने निषेध करण्यात आला. सध्या देशामध्ये जातीयवादी विचाराने थैमान घातलेले असून जो त्याविरुद्ध बोलेल त्याचा आवाज बंद करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. चार वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, त्यानंतर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे, कर्नाटकमधील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व साहित्यिक डॉ. एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्याही अशाच प्रकारे करण्यात आल्या होत्या, असे ’स्वराज अभियान’ने पत्रकात म्हटले आहे.

स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपास
गौरी लंकेश यांनी आपल्या लिखाणातून धार्मिक संकुचितवादावर, अंधश्रद्धेवर सातत्याने कोरडे ओढले होते. कलबुर्गी यांच्या हत्येच्या विरुद्ध प्रकर्षाने आवाज उठवला होता. त्यातून त्यांची हत्या झाली असल्याचा संशय आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. कर्नाटक सरकारने याचा तातडीने स्वतंत्र यंत्रणेच्या मार्फत तपास करावा. दोषी लोकांना गजाआड करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. निवेदनावर स्वराज अभियान महाराष्ट्राचे अध्यक्ष मानव कांबळे, सचिव संजीव साने यांच्या स्वाक्षरी आहेत.