पत्रावळीत भोजन करण्याचा आनंद सामूहिक पंगतीतून हरविला!

0

पिंपरी-चिंचवड : कोणताही सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रम असो, सामूहिक जेवणाच्या पंगतीत विशिष्ट झाडांच्या पानाची पत्रावळी आणि पानाचा द्रोण याला पूर्वी विशेष महत्त्व असायचे. पानाची पत्रावळ ही वरणभात आणि भाजीचा स्वाद द्विगुणीत ठरवीत आले आहेत. म्हणून पंगतीचे जेवण आपसात प्रेम वाढवणारे ठरत आले आहे. परंतु आता ही पंगतीची परंपरा हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे. पंगतीऐवजी आता सामूहिक जेवणासाठी ‘बुफे’ पद्धत वाढत चालली आहे. ग्रामीण भागात पंगत अजूनही टिकून आहे; परंतु या पंगतीतून पत्रावळी मात्र, गायब होताना दिसत आहेत. त्यामुळे पत्रावळीतील भोजनाचा स्वाद आणि द्रोणामध्ये कढी पिण्याचा आनंद पंगतीतून हरवला असल्याचे दिसत आहे. झाडाच्या पानांच्या पत्रावळींऐवजी आता शहरांमध्ये प्लास्टिक तसेच थर्माकोलचे ताट व वाट्यांचा वापर केला जात आहे. प्लास्टिक तसेच थर्माकोल हे मानवी आरोग्यास घातक असूनही त्याचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

काळाच्या ओघात बदल
जुन्या पत्रावळींची जागा आता आरोग्याला घातक ठरणार्‍या प्लास्टिक, थर्माकोलच्या ताट आणि वाट्यांनी घेतली आहे. जेवणासाठी प्लास्टिकच्या, थर्माकोलच्या पत्रावळ्या वापरल्या जातात. जेवून वापरून झालेल्या पत्रावळ्या निष्काळजीपणे इतरत्र टाकल्या जातात. याचा परिणाम पर्यावरणावरदेखील होत असून, या पत्रावळ्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम कार्यमालकांनी करणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने तसे होत नाही. पूर्वीच्या काळी साल वृक्षाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी वापरण्याची प्रथा होती. परंतु काळाच्या ओघात आधुनिक पद्धतीच्या प्लास्टिकच्या, थर्माकोलच्या पत्रावळ्या वापरल्या जातात. झाडाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ्या बर्‍याच वेळा फाटक्या असतात. सध्या जेवणात निरनिराळे अनेक पदार्थ करण्याचे फॅड वाढले आहे. यामुळे पारंपरिक पत्रावळीत एवढे सगळे पदार्थ बसत नसल्याने प्लास्टिकच्या, थर्माकोलच्या पत्रावळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.

पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी
प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळ्यांची झीज लवकर होत नाही. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. या पत्रावळ्यांतील राहिलेले अन्न भटकी कुत्री, इतर जनावरे खातात. हे अन्न खाता-खाता अन्नाबरोबरच पत्रावळीचा काही भाग त्यांच्या पोटात जाऊन त्यांनाही त्रास होतो. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी तसेच भटकी कुत्री व इतर जनावरांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर उपाय म्हणून प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळ्या मातीत गाडून टाकणे, हा पर्याय आहे.

मंगल कार्यालयांमध्ये सर्वाधिक वापर
विवाह सोहळा, साखरपुडा तसेच अन्य शुभ कार्य आता मंगल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पार पडतात. त्यामुळे अशा शुभ कार्यांच्या जेवणाच्या पंगतीसाठी मंगल कार्यालयांमध्ये प्लास्टिक व थर्माकोलचे ताट, ग्लास व वाट्यांचा वापर केला जातो. मोठ्या संख्येने येणार्‍या पाहुणे मंडळीसाठी हे ताट, वाट्यादेखील मोठ्या संख्येत लागतात. जेवण झाल्यानंतर वापरले प्लास्टिक व थर्माकोलचे ताट, वाट्या बाहेर उघड्यावर फेकून दिले जातात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. म्हणून प्लास्टिक व थर्माकोलचे ताटे, वाट्या व ग्लास यांच्यावर कायद्याने बंदी घातली पाहिजे, असे साहित्य वापरणार्‍या मंगल कार्यालयांवरही कारवाई केली पाहिजे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.