उद्यानातील निकृष्ट खेळणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
उद्यानाचे ’सेफ्टी’ ऑडीट करण्याची पालकांची मागणी
पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या हद्दीतील सर्व उद्यानाचे ’सेफ्टी’ ऑडीट करुन तुटलेल्या खेळणीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. संभाजीनगर येथील महापालिकेच्या उद्यानातील घसरगुंडीवर खेळत असताना पत्र्यात पाय अडकल्याने सहा वर्षाच्या मुलाची करंगळी निकाळी झाली. या घटनेवरून मुलाचे पालक मयूर जोशी यांनी महापालिकेकडे उद्यानांचे ऑडीट करण्याची मागणी केली आहे. यामुळे उद्यानातील निकृष्ट खेळणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नादुरुस्त खेळणीची चौकशी व्हावी…
हे देखील वाचा
मोशी, प्राधिकरणात वास्तव्यास असलेले मयूर जोशी यांचा सहा वर्षांचा मुलगा अर्थव हा 24 डिसेंबर रोजी महापालिकेच्या संभाजीनगर येथील शिव शाहू संभाजी उद्यानात खेळण्यासाठी आला होता. खेळत असताना उद्यानातील घसरगुंडीच्या पत्र्यात अथर्व याचा उजवा पाय अडकला. याघटनेत त्याची कंरगळी तुटली आहे. याबाबत अथर्वचे वडील मयुर जोशी यांनी महापालिकेला पत्र लिहून या नादुरुस्त खेळणीमुळे झालेल्या अपघाताची चौकशी करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याशिवाय महापालिकेच्या हद्दीतील सर्व उद्यानाचे ’सेफ्टी’ ऑडीट करुन तुटलेल्या खेळणीची दुरुस्ती करण्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
कर्मचार्यांचे अक्षम्य दुर्लक्ष…
मयूर जोशी म्हणाले, ’’संभाजीनगर येथील शिव शाहू संभाजी उद्यानातील घसरगुंडी महिन्याभरापासून नादुरुस्त आहे. याकडे देखभालीचे काम करणार्या कर्मचार्यांंनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. घसरघुंडी वापरु नये असा फलक देखील याठिकाणी लावण्यात आलेला नाही. त्यामुळेच हा अपघात झाला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाचे याची चौकशी करावी. नुकसान भरपाई देण्यात यावी’’.
आयुक्तांच्या सुचनेनंतर निर्णय…
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ’’या अपघाताची चौकशी करण्यासाठी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाची नियुक्ती केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार त्यावर निर्णय घेण्यात येईल’’.