पत्र हे भावनांचा आविष्कार करणारे साहित्य : पोस्टमन गडेकर

0

शब्दधन काव्यमंचातर्फे ‘पत्रास कारण की’ या पत्रवाचन, पत्रलेखन स्पर्धांचे आयोजन

रविवारी पार पडला पारितोषिक वितरण समारंभ

पिंपरी : पत्र हे भावनांचा आविष्कार करणारे साहित्य आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात पत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. काळाबरोबर पोस्टखातेही खूप बदलले आहे. एक साधे पोस्टकार्ड समाजात खूप उलथापालथ करू शकते. पत्र वाटणारा पोस्टमन आपले कर्तव्य पार पाडत असताना नकळत समाजसेवा करीत असतो, अशा भावना रेंजहिल्स पोस्ट ऑफिसात सुमारे छत्तीस वर्षे सेवा करणारे पोस्टमन जनार्दन गडेकर यांनी भाजपा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केल्या. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘पत्रास कारण की’ या पत्रवाचन, पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली होती. मोरवाडी येथे रविवारी या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांचा सन्मान करताना गडेकर बोलत होते. याप्रसंगी प्रा.तुकाराम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ.पी.एस.आगरवाल, नितीन हिरवे, माधुरी ओक, प्रदीप गांधलीकर, राधाबाई वाघमारे, अक्षय लोणकर, सुनील खंडेलवाल, सुमन गडेकर, सुनंदा चव्हाण, मृदुला येवलेकर, मंगल घस्ते, आत्माराम हारे, जयश्री गुमास्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. शोभा जोशी यांनी सादर केलेल्या ‘माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं’ या कवितेने आणि बाळासाहेब घस्ते यांनी गायलेल्या ‘मेहरबाँ लिखू हसिना लिखू हैरान हूँ के इस खतमें तुझे क्या लिखू’ या सुप्रसिद्ध चित्रपटगीताने वातावरणनिर्मिती केली.

पत्रलेखनाचे संस्कार शाळांमधून

प्रमुख पाहुणे प्रा.पाटील म्हणाले की, पूर्वी शाळेतून पत्रलेखन शिकवले जात असे. त्यामुळे व्यक्तीपरत्वे भाषाशैली कशी वापरावी याचे संस्कार होत असत. भावना व्यक्त करून त्या प्रवाही ठेवण्याचे मोठे काम पत्रं करीत असतात. शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक सुरेश कंक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, सामाजिक प्रश्‍नांवर जाणीवपूर्वक वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रलेखन करणार्‍या पत्रलेखकांचा पोस्टमन यांच्या हातून सन्मान व्हावा; तसेच हळूहळू लयास जात असलेल्या पत्रलेखनकलेला उजाळा मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले. वृत्तपत्रांमधून सुमारे पाचशेहून अधिक वेळा पत्रलेखन करणार्‍या किरण येवलेकर आणि सुभाष चव्हाण या पत्रलेखकांचा विशेष सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना येवलेकर म्हणाले की, लिखित पत्राने जो आनंद मिळतो, तो इंटरनेटवरील पत्राने मिळत नाही. चव्हाण यांनी सांगितले की, चाळीस वर्षांपूर्वी वृत्तपत्रात पहिले पत्र छापून आले त्याचा आनंद अवर्णनीय होता.

विविध पत्रांचे केले वाचन

त्यानंतर पत्रवाचन सत्रात नंदकुमार मुरडे यांनी पत्राचे आत्मवृत्त, आय.के.शेख यांनी गुलाबी प्रेमपत्र, नितीन यादव यांनी वडिलांनी मुलाला लिहिलेले परखड पत्र, समृद्धी सुर्वे यांनी स्वतःसाठी लिहिलेले पत्र, वर्षा बालगोपाल यांनी चंद्राचे पृथ्वीवरील लोकांना पत्र, माधुरी विधाटे यांनी स्व. वडिलांना पत्र, फुलवती जगताप यांनी भूमातेचे पत्र सादर केले. अशा पत्रांमधून रसिकांनी विषय वैविध्य अनुभवले. तर सुभाष चव्हाण लिखित ‘तीर्थरूप भाऊ’ या पत्राचे नंदकुमार मुरडे यांनी अतिशय भावोत्कट अभिवाचन करून श्रोत्यांना सद्गदित केले. कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. विजेत्यांमध्ये समृद्धी सुर्वे, माधुरी विधाटे तर वर्षा बालगोपाल यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला. उज्ज्वला केळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उमेश सणस यांनी आभार मानले. अ‍ॅड.अंतरा देशपांडे, मुरलीधर दळवी, रीद्धिमा सुर्वे, भाऊसाहेब गायकवाड, शिवाजीराव शिर्के, सुहास घुमरे यांनी संयोजनात सहकार्य केले.