पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत

0

पुणे। शहरातील पथदिव्यांचे वीजबिल वेळेत न भरल्याने महावितरणकडून तब्बल 50 ते 60 टक्के पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमधील अनेक रस्ते गेल्या काही दिवसांपासून अंधारात आहेत. याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे.
महावितरणकडून शहरात शून्य थकबाकी मोहीम सुरू करण्यात आली असल्याने ही कारवाई केल्याचा दावा महावितरणने केला आहे. तर महावितरणकडून वेळेवर बिले न मिळाल्याने आणि चुकीच्या पद्धतीने थकबाकीची बिले देण्यात आल्याने बिले अजून भरण्यात आली नसल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, या प्रकाराचा नाहक त्रास नियमितपणे कर भरणार्‍या पुणेकरांना सहन करावा लागत आहेत.

पालिकेने फोडले महावितरणवर खापर
शहरात महापालिकेचे तब्बल 1 लाख 25 हजार पथदिवे आहेत. या सर्व पथदिव्यांना महावितरणकडून वीज जोडणी घेण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी महावितरणला 30 ते 35 कोटींचे बीजबिल भरले जाते. मात्र, महावितरण त्या नंतरही चुकीची बिले देत असल्याने महापालिका प्रशासनाकडून ही बिले भरण्याकडे टाळाटाळ केली जात आहे. त्याचा परिणाम महावितरणकडून महापालिकेच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात तब्बल 60 टक्क्यांहून अधिक शहराचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यानंतरही महापालिकेचा विद्युत विभाग मात्र, पथदिव्यांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी तोडगा काढण्याऐवजी महावितरणवर खापर फोडण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे.