पिंपरी-चिंचवड : शहरातील पथदिव्यांवर केबलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश खांबांवर वायरचे जाळे पसरलेले दिसून येते. या केबलमुळे शहर विद्रुप होत असून केबलमुळे मोठ्या दुर्घटना देखील होण्याची शक्यता आहे. या केबल खांबांवरून तात्काळ काढून शहराच्या सुंदरतेचा भर टाकावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सहा वर्षांपासून प्रयत्नशील
निवेदनात म्हटले आहे की, समितीने यापूर्वी तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी आणि राजीव जाधव यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या. नंतर मनपा विद्युत विभाग प्रमुखांच्या पुढाकाराने संपूर्ण शहरातील सर्व रस्त्यांच्या पथदिव्यांंवरील केबल काढून शहराचे विद्रुपीकरण त्वरित थांबविले होते. त्यामुळे शहर सुंदर होण्यास चांगलीच मदत झाली. त्यावेळी शहरात सर्वत्र पथदिव्यांचे खांब विना केबल दिसत होते. मागील काही महिन्यात पथदिव्यांच्या खांबावर पुन्हा एकदा केबल वायर लटकताना दिसत आहेत.
संबधीतांवर कारवाई करावी
केबलने खांबांना पुन्हा एकदा विळखा घातला आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण पुन्हा एकदा वाढले आहे. याची गंभीरतेने नोंद घेणे आवश्यक आहे. मागील सहा वर्षांपासून पर्यावरण संवर्धन समिती वारंवार लेखी तक्रारी करून प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावर मध्यंतरी कारवाई करण्यात आली. मात्र काही कालांतराने परिस्थिती पूर्ववत झाली आहे. मागील काही दिवसांपासून केबल चालकांवर या घातक कार्यप्रणाली बाबत कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही. त्यामुळे केबल तात्काळ हटवून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी व शहराच्या सुंदरतेत भर घालावी, असेही निवेदनात म्हटले आहे.