बारामती- बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी चांगलीच गाजली. नगरपालिकेने शासन निर्णय पाळणे बंधनकारक आहे की नाही? अनेक शासन निर्णय नगरपालिका पाळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजावर सतत आक्षेप नोंदविले जातात. अनेक कामे अर्धवट अवस्थेत राहतात, अशी घणाघाती टिका नगरसेवक संजय शिंदे यांनी केली. याबाबतचे अनेक शासन निर्णय त्यांनी निदर्शनास आणून दिले. शहरात बसविण्यात आलेल्या पथदिव्यांवरून सभेत गदारोळ माजला होता. बारामती नगरपालिकेची पाचवी सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अशोक देशमुख, सचिन सातव, किरण गुजर, सुनिल सस्ते, विष्णुपंथ चौधर, बिरजू मांढरे, गणेश सोनवणे, निता चव्हाण, संजय संघवी, निलिमा मलगुंडे, अनिता जगताप, योगेश कडूसकर उपस्थित होते.
सिध्देश्वर मंदिराशेजारी उद्यान विकसीत करण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीकडून तीन महिन्यांपूर्वी 20 लाख 42 हजार 845 रुपयांचा निधी मिळाला आहे. ही रक्कम नगरपालिकेकडे तीन महिन्यापूर्वी जमा झाली आहे. मात्र नगरपालिका प्रशासन नगरसेवकांना ही माहिती देत नाही, असा आरोप विरोधीपक्ष नेते सुनिल सस्ते यांनी केला. या प्रकल्पास कार्योत्तर मंजुरी मिळण्यास उशिर झाल्यामुळे कामे उशिरा सुरू होतात. याचे खापर विरोधकांवर फोडले जाते. वेळच्यावेळी मंजुरी घेऊन तातडीने निविदा काढण्यात याव्यात, असेही सस्ते यांनी यावेळी सुनावले.
पाच वर्षापासून एकाच टाकीचे काम सुरू
शहरातील एका पाण्याच्या टाकीचे काम चक्क गेली पाच वर्षे सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नवीन पाण्याच्या टाकीचे काम सुरू असतानाच चार ठिकाणी ती लिकेज झाली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरीही प्रशासन याकडे गांभिर्याने पाहत नाही, असे नगरसेवक संजय संघवी यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी नगरसेवक सुनिल सस्ते गणेश सोनवणे, सचिन सातव यांनी प्रशासनास चांगलेच खडे बोल सुनावले. आनंदनगरमधील इंधन विहिरीचे टेंडर निघ्ाूनदेखील प्रशासनाने टेंडर निघालेच नाही, असे सांगितल्यावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. यावरून गोंधळ निर्माण झाला होता.