पथनाट्याच्या सादरीकरणात विनोदातून केले प्रबोधन

0

भुसावळ : मनोरंजनातून ज्ञान देण्यासाठी पथनाट्य हा एक उत्तम मार्ग असून लोकांपर्यंत पोहोचण्याचा तो एक सुलभ उपाय आहे. यालाच अनुसरून भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठान आणि नाशिक येथील संदीप फाऊंडेशनच्या संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी एडस् जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.

जनजागृती पंधरवाड्यात एडस् दिनानिमित्त प्रबोधन
जागतिक एडस्दिनानिमित्त आयोजित जनजागृती पंधरवाडा समारोपाप्रसंगी भुसावळ येथील बसस्थानक, जळगाव नाका व नाहाटा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. जामनेर येथील संतोष सराफ यांच्या लोकरंजन संस्थेने सहज सुलभ व विनोदी रूपाच्या माध्यमातून पथनाट्य सादर केले. पथनाट्यात त्यांनी एडस् कसा होतो, त्याची लक्षणे, घ्यावयाची काळजी आणि लोकांची मनःस्थिती याविषयी सांगितले. अधूनमधून विनोदी किस्से सांगितल्याने मनोरंजनातून लोकांना प्रबोधन करण्याचे काम लोकरंजन संस्थेने केले. यात त्यांनी पेटी, तबला, ढोल आदींचा वापर करून संगीतमय पथनाट्य सादर केले. पथनाट्य सादर होत असतांना तीनही ठिकाणी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. विनोदातून एखाद्या गंभीर विषयाची माहिती मिळाल्याने कठीण समस्येवर नियंत्रण आणण्याचा उपाय नागरिकांना सहज मिळाला. पथनाट्यासाठी संदीप युनिव्हर्सिटीचे डॉ. संदीप झा, प्रा. प्रकाश पाटील, मोहिनी पाटील, प्रा. एन.एल. भिरूड, प्रा. नितीन सरोदे यांनी सहकार्य केले. तीनही ठिकाणच्या पथनाट्य यशस्वीतेसाठी अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, प्रा. शाम दुसाने, डॉ. जगदीश पाटील, विनोद पाठक, अमित चौधरी, अतुल चौधरी, प्रभाकर नेहेते, विश्‍वजित घुले, मंगेश भावे, प्रेरणा देशमुख, निलेश दांडवेकर, कमलेश चंदन आदींनी परिश्रम घेतले.