नंदुरबार । महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशन, नंदुरबार हौशी स्केटिंग असोसिएशन व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या जाणार्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत पुणे जिल्ह्याने सुरुवातीपासून चौथ्या दिवशीही आघाडी कायम ठेवली आहे. सर्वाधिक 20 सुवर्ण पादकांसह रौप्य व कांस्य पदकांची कमाई पुणे जिल्ह्याने केली आहे. उर्वरित एका दिवसातही पुणे जिल्हाच आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. पुणेपाठोपाठ मुंबई व नागपूर जिल्ह्याने देखील आघाडीसाठी प्रयत्न केले आहे. सहभागी इतर जिल्ह्यांमध्ये नाशिक, पालघर व औरंगाबाद जिल्ह्यातील स्पर्धकांनी देखील अविरत प्रयत्न सुरु ठेवले आहे.
दोन दिवसातील सुवर्ण पदकांचे मानकरी
मेहक शाह (पुणे), पियुष मोरे (पुणे), विक्रम इंगळे (पुणे), साक्षी माथवाड (पुणे), अर्णव त्रिपाठी (मुंबई), श्रुतीका क्षीरसागर (पुणे), हिताक्षी त्रिवेदी (ठाणे), दीप मेहता (पुणे), अंश आर्य (औरंगाबाद), आर्य जाधव (नाशिक), माझीन मेमन (पालघर), अनुजा बांदिवडेकर (मुंबई), नाशा पिठावाला (मुंबई), सिद्धांत कांबळे (पुणे), निखिलेश ताभने (पालघर) व स्नेहा तैशेट्ये (मुंबई) यांचा समावेश आहे.
यांची होती उपस्थिती
पहिल्या सत्रातील यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे देऊन ध्येयाकडे वाटचाल करणार्या त्यांच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न आयोजकांमार्फत करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभात महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक पी.के. सिंग, जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशनचे सचिव ज्ञानेश्वर बुलंगे, समाज कल्याण अधिकारी राकेश महाजन, समाज कल्याण निरीक्षक वसावे, सर्जन डॉ. राजेश वसावे, उमविचे कक्षाधिकारी वसंत वळवी, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे कार्यालयीन अधीक्षक भीमसिंग वळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
संकुलाची क्रीडा संकुल अशीही ओळख व्हावी
आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे के.डी. गावीत शैक्षणिक संकुल, पथराई हे स्केटिंग व अन्य खेळांमुळे नावारूपास आले आहे. क्रीडा क्षेत्रात भवितव्य घडविण्यासाठी इच्छुक प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक त्या सुविधाही पुरविल्या जात आहे. हे देखील संकुलाच्या नावलौकिकास तितकेच महत्वाचे ठरते. येत्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट व फुटबाल स्टेडियम साकारण्यासाठी प्रयत्नशील आहे. अंडरग्राउंड सामने घडवून आणण्यासाठी आवश्यक स्टेडियमचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
-राजेंद्र गावीत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस