नंदुरबार । जिल्ह्यातील पथराई येथील के.डी.गावीत संकुलाची ओळख स्केटिंग व अन्य क्रीडा स्पर्धांमुळे महानगरातील मुले व त्यांच्या पालकांमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशन, नंदुरबार जिल्हा हौशी स्केटिंग असोसिएशन व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा पथराई येथे घेण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
दुसर्या सत्रातील तथा अंतिम बक्षीस वितरण समारंभात महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक पी. के. सिंग, जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशनचे सचिव ज्ञानेश्वर बुलंगे, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे कार्यालयीन अधीक्षक भीमसिंग वळवी, राकेश कलाल, जीवन पाटील, सविता बुलंगे, नंदुरबार तालुका क्रीडा विभागाचे अध्यक्ष वळवी, अखिलेश यादव, काशीकर कदम, जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष बी.डी. जाधव, विठ्ठल मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
50 पदके पुणे जिल्ह्याला
स्पर्धेत पुणे जिल्ह्याने सुरुवातीपासून अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत सर्वाधिक 20 सुवर्ण पादकांसह 50 पदकांची कमाई केली. पुणेपाठोपाठ मुंबई व पालघर जिल्ह्याने देखील आघाडीसाठी अविरत प्रयत्न केले. परंतु त्यास अनुक्रमे 13 व 5 अशा सुवर्ण पादकांसह अनुक्रमे 33 व 14 पादकांवर समाधान मानावे लागले. उर्वरित नागपूर, ठाणे, नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्यांनी देखील स्पर्धेत अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. पुणे येथील मेहक शाह या स्पर्धक मुलीने 12 ते 16 वर्ष वयोगटात इनलाईन प्रकारांतर्गत रिंक-6, पॉईंट टू पॉईंट व रोड एलिमिनेशन या तिन्ही प्रकारच्या स्पर्धेत प्रथम येत सुवर्ण पदक पटकावले. शिवाय एलिमिनेशन प्रकारातही तिने सुवर्ण पदक मिळवत स्पर्धेत प्रभाव टाकत आदर्श स्केटर (खेळाडू) चा बहुमान मिळवला.