पदपथांचे रुंदीकरण तरीही पादचार्‍यांचा जीव धोक्यात

0

64 पादचार्‍यांनी गमावला जीव; सुरक्षेबाबत वाहतूक पोलिसांचा महापालिकेला प्रस्ताव

पुणे : महापालिकेकडून विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेले रस्ते रुंद न करता त्याच रस्त्यावरील पदपथांचे रुंदीकरण सुरू असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे बेशिस्त वाहनचालकांच्या चुकीमुळे गेल्या वर्षभरात 64 पादचार्‍यांना जीव गमावावा लागला आहे. पदपथांच्या रुंदीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, तर पथारीवाले व वाहनचालक यांच्या त्यावरील अतिक्रमणाने पादचार्‍यांचा जीव मात्र धोक्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी आता पादचार्‍यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पदपथांची दुरुस्ती तसेच पदपथांवर वाहन शिरण्याच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पादचारी सुरक्षितता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

पदपथांसाठी उपाययोजना

पदपथ सुस्थित करणे, पदपथांवरील अतिक्रमणे काढून टाकणे तसेच पदपथांवर वाहने शिरू नयेत म्हणून तेथे दगडी कठडे किंवा लोखंडी जाळी बसवणे, अशा सूचना असलेला प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून महापालिका आयुक्त राव यांना देण्यात आला आहे. ज्या भागात अपघात झाले आहेत, अशा भागांची पाहणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचे वळण आहे, तेथे पदपथ नाहीत, त्यामुळे अशा भागात तातडीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहराच्या मध्यभागात देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे मध्यभागातील अनेक पदपथांची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

पथारीधारकांची अतिक्रमणे

शिवाजी रस्त्यावरील बुधवार पेठ चौक ते बेलबाग चौक हा भाग सर्वाधिक वर्दळीचा आहे. मध्य भागातील व्यापारीपेठेत नागरिक खरेदीसाठी येतात. त्यामुळे या चौकादरम्यान रस्त्याच्या उजव्या बाजूला चार फूट रुंदीचा पदपथ तयार करणे गरजेचे आहे. बुधवार चौक ते रामेश्‍वर चौक दरम्यान रस्त्याच्या कडेला पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या भागातील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत. अतिक्रमणे काढल्यास या भागातील कोंडी दूर होईल तसेच पादचार्‍यांना चालणेदेखील शक्य होईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन

विकास आराखड्यामध्ये अनेक रस्त्यांची रुंदी वाढविण्यात आली आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रियादेखील सुरू आहे; परंतु ती पूर्ण होईपर्यंत थांबण्याऐवजी नागरिकांना सोयीसुविधा देणे गरजेचे आहे. रुंदीकरणाच्या जागा ताब्यात आल्यानंतर तेथे नागरिकांना अन्य सुविधा देता येऊ शकतात, असे महापालिका पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

रस्ताच होणार धोकादायक

दरम्यान रस्ता रुंदीकरण न करता त्या रस्त्यावरील पदपथाचे रुंदीकरण करण्याच्या महापालिकेच्या उलट्या धोरणामुळे त्या रस्त्यावरील एखादी मिळकत पुनर्विकासाठीआल्यास त्यांना पुढील जागा मोकळी सोडावी लागेल. यामुळे त्या इमारतीपुरतेच त्या रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याने रस्ता वळणावळणाचा होऊन धोकादायक होणार आहे. त्या इमारतीच्या पुढील जागा मोकळी आणि पदपथ यामध्ये अंतर राहणार असल्याने भविष्यात तेथे अतिक्रमणांना चालना मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.