पदपथांवरील अतिक्रमणांचा दंडही भरा आता ऑनलाइन

0

पुणे । महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईनंतर जप्त केलेले साहित्य सोडवून घेण्यासाठी पथारी व्यावसायिकांना आकारला जाणारा दंड आता ऑनलाइन अथवा नागरी सुविधां केंद्रांमध्ये भरता येणार आहे. अतिक्रमण कारवाईनंतर साहित्य सोडविण्यासाठी काही कर्मचारी अनेकदा आर्थिक गैरप्रकार करीत असल्याच्या तक्रारींची संख्या वाढल्याने पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांत केली जाणार आहे.शहरात फेरीवाला धोरण 2014 ची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार महापालिकेने नो हॉकर्स झोन म्हणून घोषीत केलेले 45 रस्ते आणि 154 चौकांमधील तब्बल 10 हजार व्यावसायिकांचे शहरातील 304 जागांवर पुनर्वसन करण्याचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार असून ज्या ठिकाणचे पुनर्वसन पुर्ण झाले आहे तेथे महापालिका कारवाई तसेच परवाना शुल्क आकारत आहे.

व्यावसायिकांची लूट थांबणार
सर्व व्यावसायिकांना जागेसाठी महापालिकेने निश्‍चित केलेले मासिक शुल्क आणि आकारलेला दंड पालिकेच्या कोणत्याही कर्मचार्‍यांकडे जमा न करता तो ऑनलाइन भरता येणार आहे. ही रक्कम अतिक्रमण विभागाच्या खात्यात जमा करण्यासाठी यंत्रणाही उभारली जाणार आहे. या व्यावसायिकांना पालिकेने आकारलेला दंड तसेच मासिक शुल्क महापालिकेच्या नागरी सुविधांमध्येही जमा करता येणार आहे. या दंडाच्या रकमेची पावती अतिक्रमण विभागास दाखवून आपले साहित्य सोडवून घेणे व्यावसायिकांना शक्य होणार आहे. हे साहित्य परत देताना होणारे गैरप्रकार तसेच व्यावसायिकांची लूटही यामुळे थांबण्यास मदत होणार आहे.

10 हजार व्यावसायिकांचे पुनर्वसन
महापालिकेने शहरात सुमारे 21 हजार पथारी व्यावसायिकांची बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण केली असून त्यांना प्रमाणपत्र वाटण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातील 10 हजार व्यावसायिकांचे शहरातील 311 जागांवर पुनर्वसन केले जाणार आहे. यासाठी 304 जागा निश्‍चित झाल्या आहेत. त्यातील 75 जागांवर पुनर्वसन पूर्ण झाले असून 15 क्षेत्रीय कार्यालयांनी 20 नोव्हेंबरपर्यंत आणखी 200 जागांवरील पुनर्वसन पुर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे कामही युध्दपातळीवर सुरू असून हे पुनर्वसन होताच, पालिकेकडून या भागातील बेकायदेशीर व्यावसायिक तसेच निश्‍चित केलेली जागा सोडून इतर ठिकाणी व्यवसाय करणार्‍यांवर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.