पदपथांवरील पार्किंगमुळे नागरिकांना रस्त्याचा आधार

0

नवी मुंबई । सेक्टर 4 मधील पदपथांवर वाहने पार्किंग केली जात असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. वाहतुकीची वर्दळ असणार्‍या रस्त्यावरून चालताना अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहतूक पोलीस आणि पालिका मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नेरुळ सेक्टर 4 मधील ग्रेट इस्टर्न गॅलरी या इमारतीमध्ये नाईक कार्यालये आहेत या कार्यालयात काम करणारे कर्मचारी आणि कामानिमित्त येणारे नागरिक इमारतीच्या बाहेरील रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करतात. या वाहनांमुळे शेजारी असणार्‍या सोसायट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांना सोसायटीमधून वाहने आत बाहेर करताना मोठी कसरत करावी लागत होती.

या अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने उभी केली जात असल्याने मोठी वाहने देखील ये-जा करू शकत नव्हती नागरिकांनी तक्रारी करून हा रस्ता नो पार्किंग झोन करून घेतला. या ठिकाणाची पार्किंग बंद झाल्यावर वाहनचालकांनी जागा बदलली असून याच इमारतीच्या बाजूला सारस्वत बँकेच्या बाहेरील पदपथावर वाहने उभी करण्यास सुरुवात केली आहे.

वाहनांवर कारवाई करण्याची मागणी
पदपथावर दुचाकी आणि रस्त्याच्या कडेला चार चारचाकी वाहने उभी होत असल्याने नागरिकांना पदपथावरून न चालता रत्यावरून चालावे लागत आहे. या मार्गावरून एनएमएमटी आणि बेस्ट बस लहान मोठी वाहने, स्कुल बस यांची मोठी वर्दळ असते परिसरात असणार्‍या शाळांमध्ये अनेक विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक पायी चालताना या पदपथांचा वापर करतात परंतु पदपथांवर आणि रस्त्याच्या कडेला वाहने उभी असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. वाहनांची वर्दळ असणार्‍या या रस्त्यावरून चालताना आजवर अनेक लहान मोठे अपघात झाले असून पदपथ नक्की कोणासाठी बनविले आहेत? असा सवाल नागरिक विचारात आहेत. पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर कारवाई करून नागरिकांसाठी पदपथ रिकामा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.