ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश; एक ते दीड वर्षांत काम पूर्ण करावे
पुणे : शहरातील पदपथांवर अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब (फीडर पिलर्स) संयुक्त खर्चातून येत्या एक ते दीड वर्षात हटवावेत व ते योग्य जागी स्थानांतरित करण्यात यावे, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी महापालिका व महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिले. सेनापती बापट रस्त्यावरील प्रकाशभवनमध्ये महावितरण व पुणे महापालिकेची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव, महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल उपस्थित होते.
या बैठकीत शहरातील फुटपाथवरील फिडर पिलर्समुळे पादचार्यांना त्रास होत असून अपघाताची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली. यावर यांनी महावितरण व महापालिकेने संयुक्तपणे एक समिती स्थापन करून असे धोकादायक ठिकाणांची यादी तयार करावी आणि संयुक्त खर्चाने येत्या एक ते दीड वर्षात ते योग्य जागी स्थानांतरीत करावेत व त्याचा अहवाल वेळोवेळी महापौरांना सादर करण्यात यावा असे निर्देश दिले. तसेच भूमिगत वीजवाहिन्यांसाठी आवश्यक असलेले खोदकाम ही महापालिकेच्या मंजुरीनंतरच करण्यात यावी व ही मंजुरी पालिकेच्या अधिकार्यांनी त्वरित देण्याची कार्यवाही करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी केली.
ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला आदेश
वीजपुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात यावे. जर एखाद्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकार्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या प्रशासनाला दिले आहेत. प्रकाशभवन येथे महावितरण व महापारेषणच्या पुणे जिल्ह्यातील कामांचा आढावा ऊर्जामंत्री यांनी घेतला. यावेळी सर्वाधिक वीजपुरवठा खंडित होत असलेल्या परिसरांची व विभागांची नावे बावनकुळे यांनी जाणून घेतली. नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी वीजयंत्रणेवर बारीक लक्ष ठेवावे व खंडित होण्याचे नेमक्या कारणांवर कायमस्वरुपी उपाययोजना करावी. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडल्यास त्याचा कालावधी कमीतकमी राहिल, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिली. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील महापारेषणच्या विविध उपकेंद्राची सुरू असलेली कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी. प्रसंगी त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करून नव्या कंत्राटदारांना कामे देण्याचे आदेश बावनकुळे दिले. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, सुनील पावडे, महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास मस्के उपस्थित होते.