पुणे । जेव्हा आपण पदवी मिळविण्याकरीता शिक्षण घेतो, तेव्हा आपल्याला खर्या अर्थाने शिक्षणाचे लायसन्स मिळालेले असते. अनेकांचा असा समज असतो की, पदवी मिळाली म्हणजे शिक्षण पूर्ण झाले. मात्र, पदवीचे शिक्षण ही शिक्षणाची खरी सुरुवात आहे. कोणतेही शिक्षण घेताना आपल्यामधील त्या विषयाबद्दल उत्कंठा कमी होता कामा नये. प्रत्येक टप्प्यावर नवनवीन शिकण्याकरीता आपण कायमच सज्ज रहायला हवे, असे मत आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांनी व्यक्त केले. माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्यावतीने माहेश्वरी स्कॉलर पुरस्कार प्रदान सोहळा मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष अरुण लखानी, संस्थेचे अध्यक्ष अतुल लाहोटी, रमेश धूत, पुरस्कार समितीचे अध्यक्ष राजेंद्र तापडीया, डॉ.वसंत बंग, सुलेखा न्याती, अमित राठी, डॉ. नवीन काब्रा, गोविंद जखोटिया आदी यावेळी उपस्थित होते.
माहेश्वरी स्कॉलर्सला सुवर्णपदक प्रदान
यंदाचा माहेश्वरी स्कॉलर 2017 पुरस्कार मधुर बाहेती, नीना गिलडा, दर्शित जाजू, आर्ची काब्रा, डॉ. आकांक्षा राठी, राकेश राठी, डॉ. श्रद्धा सोमाणी यांना प्रदान करण्यात आला. माहेश्वरी स्कॉलर्स करीता 50 हजार रुपयांचे सुवर्णपदक देण्यात आले. तर, प्रॉमिसिंग माहेश्वरी स्कॉलर 2017 पुरस्कार साहिल भट्टड, यश हेडा, प्रियांका लोया, झराना माहेश्वरी, शशिरेखा मुंदडा, आस्था सारडा, श्रीया सोमाणी यांना देण्यात आला. त्यांना 25 हजार रुपयांचे रौप्यपदक प्रदान करण्यात आले. श्रेया तापडिया, श्रुती जाजू यांनी सूत्रसंचालन केले. अतुल लाहोटी यांनी प्रास्ताविक तर डॉ. वसंत बंग यांनी आभार मानले.
वाचन महत्त्वाचे
शिक्षणादरम्यान अनेक संधी उपलब्ध होत असतात, त्याचा प्रत्येकाने फायदा घ्यायला हवा. आपल्यातील नकारात्मक गोष्टींपेक्षा सकारात्मक मुद्यांवर भर देऊन पुढे वाटचाल करायला हवी, तरच जीवनात प्रत्येकजण यशस्वी होऊ शकतो. स्वत:चे विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याकरीता बोलणे आणि वाचणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांनी सांगितले. आपण एकटे कोणतेही मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकत नाही, त्याकरीता इतरांना एकत्र करून संघ पद्धतीचा अवलंब करण्याकरीता आपण प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले.