जामनेर । शेतकरी आत्महत्याचे सत्र दिवसेंदिवस थांबत नसल्याचे चित्र सध्या राज्यभरात दिसत आहे. दरम्यान जामनेर तालुक्यातील लहासर येथील पदवीधर शेतकरी सागर उर्फ किसन पाटील यांने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी 22 रोजी घडली. सकाळी नेहमी प्रमाणे तो शेतात गेला होता. सागरची आई शेतामध्ये आल्यावर त्यांना संबंधीत घटना लक्षात आली. त्यांनी शेजारच्या शेतातील लोकांना हाक देऊन घटनेबाबत कळविले. उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली चांदा यांनी त्यांना मृत घोषीत केले. सागर पाटील हा स्वतःच्या मालकीची पाच एकर शेत जमीन आहे. आई, वडील, बहिण यांच्यासह तो राहत होता. त्याच्यावर सोसायटी व सावकारी असे मिळून चार लाखाचा कर्ज होते. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शरद पाटील, डॉ.सुरेश पाटील, विकास पाटील, एकनाथ पाटील, शरद पाटील, मुरलीधर पाटील आदी नेते मंडळीनी रुग्णालयात धाव घेतली.