पदवीवर वडिलांच्या नावाच्या उल्लेखाची सक्ती नको

0

नवी दिल्ली : पदवीवरील वडिलांच्या नावाचा उल्लेख अनिवार्य असू नये, यासाठी महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. एकल पालकत्वामुळे काही विद्यार्थ्यांना वडिल नसू शकतात. त्यामुळे पदवीवर वडिलांच्या नावाचा उल्लेख सक्तीचा नसावा, अशी मागणी मनेका गांधी यांनी केली आहे. या आधी मनेका गांधी यांनी पासपोर्टसाठीही अशीच विनंती केली होती.

एकल पालकत्व स्वीकारणार्‍या, विभक्त झालेल्या अनेक महिलांना त्यांच्या मुलांच्या पदवीवर वडिलांच्या नावाचा उल्लेख करताना अडचणी येत असल्याची व्यथा मांडली. त्यामुळे पदव्यांवर वडिलांच्या नावाचा उल्लेख अनिवार्य नसावा, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे. हा मुद्दा संवेदनशील असल्याने तो योग्यपणे हाताळला जावा, अशी मागणी मनेका गांधी यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे केली आहे. लग्न मोडलेल्या महिलांच्या मनाचा विचार करुन या मुद्याचा गांभीर्याने विचार केला जावा आणि संबंधित महिलांच्या मुलांना पदवीवर वडिलांचे नाव लावण्याची सक्ती केली जाऊ नये, असे मनेका गांधी यांचे म्हणणे आहे.

घटस्फोटित महिला किंवा एकल पालकत्व स्वीकारणार्‍या महिला मुलांना वाढवतात. मात्र पासपोर्ट किंवा मुलांना मिळणार्‍या पदव्यांवर वडिलांच्या नावाचा उल्लेख अनिवार्य असतो. त्यामुळे या महिलांची मोठी अडचण होते. अनेक महिलांना संबंधित विभागांकडून उलटसुलट प्रश्‍न विचारले जातात. या प्रश्‍नांमुळे महिलांना मनस्तापाला सामोरे जावे लागते, असे महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.