पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण कायम

0

नवी दिल्ली: पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. कोर्टाने याबाबतची याचिका फेटाळून लावत 2020-21 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. इतकेच नव्हे, तर मराठा आरक्षणांतर्गत झालेले प्रवेशही रद्द करण्याची याचिका कोर्टाने तूर्तास फेटाळली आहे.
वैद्यकीय आणि दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना 2020-21 या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणानुसार प्रवेश दिला जाईल. हे सर्व प्रवेश मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकेवरील निर्णयाच्या अधीन असतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मे 2019 मध्ये निर्णय देताना पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा निर्णय दिला होता. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी करताना, मराठा आरक्षणप्रकरण प्रलंबित असल्याने त्याबाबत स्थगिती देता येणार नाही, असे म्हटले आहे.