सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांनी आपापली पार्टी बैठक घेतलीच नाही
पिंपरी-चिंचवड : दिवाळीचे उत्साही वातावरण, पदाधिकारी, अधिकारी यांचा बार्सिलोना दौरा आणि सुस्तावलेला कामगार वर्ग यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या मंगळवारी होणार्या महासभेपुढे अनिश्चततेचे सावट आहे. सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांनी आपल्या पक्षाच्या नगरसवेकांची ’पार्टी मिटींग’ न घेतल्याने सभा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांना श्रद्धांजली वाहून सभा कामकाज तहकूब केले जाणार असल्याचे, सत्ताधारी पक्षातील सूत्रांनी सांगितले.
अधिकारीही होते दौर्यावर
नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुट्टीत गेला. पालिकेला सलग सहा दिवस सुट्टी होती. 6, 7, 8, 9, 10 आणि 11 नोव्हेंबर अशी सहा दिवस सुट्टी होती. त्यानंतर सोमवारी (दि.12)स्मार्ट सिटीचे संचालक असलेले पदाधिकारी आणि अधिकारी स्पेन देशातील बार्सिलोना शहराच्या दौ-यावर गेले होते. स्मार्ट सिटीचे संचालक असलेले महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटी सेलचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आणि सह शहर अभियंता राजन पाटील यांचा दौ-यात सहभागी झाले होते. त्यामुळे मागील आठवड्यात देखील प्रशासन सुस्तावले होते.
साने अजूनही परदेशातच
स्पेन दौ-यावरुन आयुक्त श्रावण हर्डीकर दोन दिवसांपूर्वीच शहरात परतले. तर, आज काही पदाधिकारी शहरात आले असून विरोधी पक्षातील नेता अद्यापही परदेशातच आहे. नोव्हेंबर महिन्याची महासभा उद्या असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक आज ’पार्टी मिटिंग’साठी पालिका वर्तुळात फिरत होते; मात्र नेत्याकडून कोणताही निरोप आला नाही. त्यामुळे ते मिटिंगविना परत गेले. नगरसवेकांची ’पार्टी मिटींग’ न घेतल्याने उद्या होणारी सभा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
अशी आहे विषयपत्रिका
महासभेपुढे पिंपरी-चिंचवड शहरात एलईडी पथदिवे बसविणे, सह शहर अभियंतापदी मकरंद निकम यांना बढती देणे, आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेला मंजुरी देणे, पीएमपीएलच्या बस पार्किंगसाठी महापालिका मुख्यालयासमोरील जागा देणे, महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय(वायसीएम) मधील मल्टिप्लेस हायड्रोलिंक ऑक्सिजन चेंबर विथ एअर लॉक सिस्टिमसाठी (एचबीओटी) केंद्र खासगी तत्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. यासारखे महत्वाचे विषय मंजुरीसाठी विषयपत्रिकेवर आहेत.