पदाधिकार्‍यांचा लागणार कस!

0

जळगाव (प्रदीप चव्हाण) । मिनी विधानसभा संबोधल्या जाणार्‍या जिल्हा परिषद सदस्य तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींची निवडणुक प्रक्रिया पार पडली आहे. जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे. बहुमतासाठी भाजपाला एका जागेची आवश्यकता होती कॉग्रेसने बिनशर्त पाठींबा दिल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्हीही भाजपाचे झाले. त्यानंतर झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने कॉग्रेसला एक सभापतीपद देऊन खुश करण्याचा प्रयत्न केला. विषय समिती सभापतीपदाची निवड करण्यात आली असून विषय समिती सदस्यांच्या नेमणुकीला दोन आठवड्याचा कालावधी बाकी आहे. भाजपाने सामाजिक आणि भौगोलीक समतोल साधत पदाधिकार्‍यांची निवड केली आहे. तरीही अनेकांची नाराजी आहे. त्यामुळे आता विषय समिती सदस्यपदाची नेमणुक करतांना पदाधिकार्‍यांची मोठी कस लागणार आहे. जिल्हा परिषदेत एकुण दहा विषय समिती असतात.

कोरम अभावी बैठक रद्द
जिल्ह्यात दोन महिन्यापासून जिल्हा परिषद निवडणुकीची आचार संहिता लागु होती. जिल्हा परिषद सदस्यपदाच्या निवडणुकीनंतर एक महिन्याने पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत स्थायी, सर्वसाधारण तसेच इतर बैठका होऊ शकल्या नाही. शनिवारी 1 रोजी जिल्हा परिषदेतील कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरम अभावी आत्तापर्यतच्या सर्व बैठका रद्द करण्यात आला.

पाठींबा देणार्‍यांचा आगोदर विचार
जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी भाजपाला एका जागेची आवश्यकता होती. कॉग्रेसने भाजपाला बिनशर्त पाठींबा जारी केला होता तरीही भाजपाने राजकीय खेळी करुन राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तीन सदस्यांचा अपघात घडविल्याचे बोलले जात आहे. ज्यांनी ज्यांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपाला मदत दिली होती त्यांचा विचार विषय समिती सदस्यपद देतांना अगोदर केला जाणार आहे.

स्थायी, जलव्यवस्थापनसाठी चढाओढ
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासह सभापतिपदाच्या निवडीनंतर आता विषय समिती सदस्यांसाठी सर्वच पक्षातील सदस्यांची चढाओढ सुरू झाली आहे. यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सभापती निवडीनंतर होणार्‍या पहिल्या सर्वसाधारण सभेपर्यंत ही निवड होणे अपेक्षित आहे. स्थायी जलव्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद हे ज.प.अध्यक्षाकंडे राखीव असते. बहुतांश विषय हे स्थायी समितीकडूनच जात असतात. त्यामुळे यांचे महत्त्व मोठे आहे. यात पद मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चढाओढ सुरु आहे.

चाचपणी सुरु
जिल्हा परिषदेत एकुण दहा विषय समिती असतात. दहा समित्यांमध्ये सभापतीसह आठ सदस्यांचा समावेश केला जातो. विषय समितीत सर्व सदस्यांची नेमणुक करण्यात येते. सभापतींची निवड झाली असून त्यांनी पदभार स्विकारला आहे. यामुळे आता समित्या सदस्यांच्या निवडीकडे लक्ष लागून आहे. महत्त्वपूर्ण समितीत पद मिळविण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांमार्फत सेटींग लावण्यास सुरुवात झाली आहे. पदाधिकार्‍यांमार्फत समिती सदस्य निवडीसाठी नियोजन केले जात आहे.