पदाधिकार्‍यांच्या फायद्यासाठी आयुक्तांना आणले

0

विरोधी पक्षनेता दत्ता साने यांचा आरोप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत होणार्‍या भ्रष्टाचारात आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा देखील सहभाग आहे. सत्ताधार्‍यांच्या भ्रष्ट कारभाराला ते पाठिशी घालतात. भाजपच्या आमदार, पदाधिकारी, नगरसेवकांचे खिसे भरण्यासाठीच त्यांना नागपूरवरुन पिंपरी महापालिकेत पाठविले आहे. आयुक्त भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे कामकाज करतात, असा आरोप नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले अत्यंत विश्‍वासू आणि नागपूर महापालिकेत आयुक्त असलेले श्रावण हर्डीकर यांना पिंपरी पालिकेत आयुक्त म्हणून पाठविले. तेव्हापासूनच हर्डीकर हे भाजपच्या जवळचे असल्याचे बोलले जात होते. त्यांनी देखील भाजपला अनुकूल असे निर्णय घ्यायला सुरुवात केली. त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर आरोपांची राळ उठविली होती. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना ते वेळ देतात. मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेळ देत नाहीत. नवीन प्रकल्प आणताना विश्‍वासात घेतले जात नाही, असा आरोपही विरोधकांनी केला आहे.

दमबाजी करणे चुकीचे
याबाबत बोलताना साने पुढे म्हणाले की, आयुक्त श्रावण हर्डीकर भाजपचे प्रवक्ते आहेत. सत्ताधार्‍यांच्या भ्रष्ट कारभाराला पाठिशी घालतात. पालिकेत होणार्‍या भ्रष्टाचारात ते सहभागी आहेत. भ्रष्टाचार कसा करायची याची शिकवण ते सत्ताधार्‍यांना देत आहेत. भाजपच्या आमदार, पदाधिकारी, नगरसेवकांचे खिशे भरण्यासाठीच त्यांना नागपूरवरुन पिंपरी महापालिकेत आणले आहे. पदाधिकारी अधिकार्‍यांना दमबाजी करून चुकीची कामे करुन घेत आहेत. अधिकार्‍यांना दमबाजी करणे चुकीचे आहे. अधिकार्‍यांना कोणी दमबाजी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाहीत. चांगल्या कामासाठी अधिकार्‍यांच्या पाठिशी उभे राहणार आहोत.