पदाधिकार्‍यांना कमवायची आहे कचर्‍यातून संपत्ती

0

आढळराव यांचा आरोप : मोशी कचरा डेपोच्या आगीची केली पाहणी

पिंपरी-चिंचवड : कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस अधिक उग्र होणार आहे. महापालिकेतील अधिकारी आणि सत्ताधार्‍यांचे त्याकडे दुर्लक्ष होत असून त्यांना कचर्‍याची विल्हेवाट लावायची नाही. तर, कचर्‍यातून संपत्ती निर्माण करायची आहे. मोशीतील कचरा डेपोच्या आगीमुळे भोसरी परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेपोला आगी लागण्याच्या घटना रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलून या परिसरातील रहिवाशी नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी अधिकार्‍यांना केल्या आहेत. तसेच कचरा समस्या सोडविण्यासाठी जिथे कचरा निर्माण होतो तिथेच तो जिरविण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

24 तासानंतर आग धुमसती
महापालिकेच्या मोशी कचरा डेपोला गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास आग लागली आहे. 24 तास होत आले तरी ही आग आणखी धुमसत असून धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आढळराव यांनी आगीची पाहणी केली. यावेळी शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख राम गावडे, शहर संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट उपस्थित होते. दरम्यान, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी आगीची माहिती दिली.

आगीस प्रशासन जबाबदार
आढळराव म्हणाले, आग लागण्यास पालिकेचे प्रशासन जबाबदार आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या चुकीचा त्रास विनाकारण भोसरी परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील सर्व कचरा एका ठिकाणी न आणता प्रभागातील कचरा प्रभागात जिरविणे आवश्यक आहे, असेही आढळराव म्हणाले. वेस्ट-टू एनर्जी प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाही. आजपर्यंत तो प्रकल्प कुठेच यशस्वी झाला नाही. पालिकेने घाईघाईत वेस्ट-टू एनर्जी प्रकल्पाची निविदा काढली आहे. हा एक प्रयोगच होणार आहे.

सर्वजण भ्रष्टाचारात मग्न
पालिकेतील प्रशासन आणि सत्ताधारी केवळ भ्रष्टाचारात मग्न आहेत. केवळ निविदा काढण्याचे काम पालिकेत सुरु आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती होते, हे पाहिले जात नाही. पिंपरी पालिकेला भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतात तोड नाही. भ्रष्टाचाराच्या बाबतीत पालिकेची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. भ्रष्टाचाराची ‘पीएचडी’ केलेले सत्ताधारी आहेत, असा टोला आढळराव यांनी लगावला.