उरण । पौैराणिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या द्रोणागिरी डोंगरातून कोणत्याही प्रकारचे उत्खनन केले जाऊ नये यासाठी मागील आठ – दहा वर्षांपासून संघर्ष करणार्या उरण सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रकार नुकताच घडून गेला आहे. उरण तालुक्याला असलेल्या या अत्यंत लाजिरवाण्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी उरण सामाजिक संस्थेच्या वतीने आज उरण तहसील कार्यालयासमोर काही तासांचे धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेले उरणचे आमदार मनोहरशेठ भोईर यांनी द्रोणागिरी पर्वताला ऐतहासिक दर्जा मिळण्यासाठी अधिवेशनात भांडणार असल्याची स्पष्ट गवाही देतानाच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना जर कोणी समाजकंटक अशाप्रकारे घरी जाऊन धमक्या देण्याइतपत मजल मारत असतील, तर इथले पोलीस प्रशासन करते काय, असा सवाल करून सामाजिक कार्यकर्त्यांना धमकावण्याची प्रवृत्ती यापुढे ठेचून काढली जाईल, असा गर्भित इशारा दिला.
द्रोणागिरी पर्वताच्या उत्तर बाजूस खासगी जमिनीत मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. सातत्याने पत्रव्यवहार केल्याने संतप्त झालेला ठेकेदार तथा भाजपचा कार्यकर्ता वामनशेठ तांडेल आणि त्यांचा मुलगा सूरज तांडेल यांनी उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणिस संतोष पवार आणि पूर्व विभागातील कार्यकर्ते रुपेश पाटील यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत उरण पोलिसांनी केवळ अदखलपात्र एवढीच नोंद करून घेतली. मात्र, गंभीर स्वरूपाचा प्रकार असूनही गंभीर गुन्हा दाखल केलेला नाही त्याचप्रमाणे उरण तहसीलदारांनीदेखील डोंगरातून माती चोरणार्यांविरोधात कडक कारवाई करण्याऐवजी बोटचेपे धोरण स्वीकारले आहे. याविरोधात उरण सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांना येत असलेल्या धमक्यांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. याला तालुकाभरातून शेकडो नागरिकांनी उपस्थिती दाखवत पाठिंबा दिला आहे.
उरण तालुक्याची संरक्षक भिंत म्हणून उरणच्या द्रोणागिरी डोंगराकडे पाहिले जात आहे. पुराणकाळात रामायणात लक्ष्मण मूर्च्छित पडले त्यावेळी हनुमंताने संजीवनी आणण्यासाठी म्हणून हिमालयातून आपल्या हातावर उचलून आणलेल्या द्रोणागिरी डोंगराचा काहीसा भाग या ठिकाणी पडला तोच हा द्रोणागिरी डोंगर आहे असे मानले जात आहे, तर याच डोंगरावर द्रोणागिरी नावाचा किल्ला आणि त्याचे अवशेषही आहेत. त्यामुळे या डोंगराला पौराणिक व ऐतिहासिक असे अनन्य साधारण महत्त्व आहे. भारताला सर्वाधिक उत्पन्न देणार ओएनजीसी प्रकल्पही याच द्रोणागिरी डोंगराला अगदी खेटून उभारण्यात आला आहे. उरण तालुका संपूर्णपणे कंटेनरचे जंगल होत असताना केवळ द्रोणागिरी डोंगरावर असलेल्या दाट झाडीमुळेच ढग आडून उरण तालुक्यात चांगला पाऊस होत असतो, अशा अनेक कारणांनी हा डोंगर अतिशय महत्त्वाचा म्हणून मानला जात आहे. त्यामुळेच या डोंगरातून कोणत्याही प्रकारचे उत्खनन केले जाऊ नये हीच उरण सामाजिक संस्थेची अगदी सुरुवातीपासूनची मागणी आहे. त्यावर 10 वर्षांपासून संस्थेचे कार्यकर्ते काम करत आहेत.
निषेध आंदोलनाला भाजपवगळता इतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा पाठिंबा
निपुण विनायक हे रायगडचे जिल्हाधिकारी असताना रात्री बारा – एक वाजताही थेट जिल्हाधिकारी यांना फोन करून या डोंगरात त्याकाळी होणारे उत्खनन थांबवण्याची किमया उरण सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी साधली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या या डोंगराच्या कुशीलाच ओएनजीसी प्रकल्पाला अगदी खेटून एका खासगी जागेत प्लॉटिंग करण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन करण्यात आले आहे. याबाबत उरण सामाजिक संस्थेने केलेल्या सततच्या तक्रारी आणि पाठपुराव्याच्या अनुषंगाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी या घटनास्थळी भेट दिली होती त्याच अनुषंगाने कंत्राटदार वामन तांडेल यांनी संतोष पवार आणि रुपेश पाटील यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. रुपेश पाटील यांच्यावर थेट दगड डोक्यात घालण्यासाठी उचलण्यात आला होता ज्याची व्हिडिओ रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे, असे असतानाही उरण पोलिसांनी बोटचेपे धोरण स्वीकारत गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवजी केवळ एनसी नोंदवून प्रकरण संपवण्यात आल्याने उरण पोलीस सामाजिक कार्यकर्त्यांचे खून होण्याची वाट पाहतात का, असा सवाल आजच्या निषेध आंदोलनातून व्यक्त करण्यात आला आहे. या निषेध आंदोलनाला भाजपवगळता इतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावून आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष मनोज भगत, शेकापचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, सभापती नरेश घरत, मनसेचे राज्य नेते संदेश ठाकूर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, सामिया बुबेरे, महेश म्हात्रे आदी उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत उरण सामाजिक संस्थेचे सुधाकर पाटील, भूषण पाटील आणि ज्यांना धमक्या मिळाल्या ते संतोष पवार आणि रुपेश पाटील यांनी केले. यावेळी आंदोलकांच्या निवेदनाचा पोलीस निरीक्षक कोल्हटकर यांनी स्वीकार केला.