पदाधिकार्‍यांना पालकांनी धरले धारेवर

0

आंबेगाव । अवसरी खुर्द येथील कन्याशाळेत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होते. या गैरसोयींबाबत दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत या पत्रांना ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवल्याचे दिसून येते. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी (दि. १८) शाळेसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. ही माहिती समजताच उपसरपंच अनिल शिंदे, आनंदराव शिंदे, माजी सरपंच कल्याण शिंदे, माजी उपसरपंच निलेश टेमकर यांनी शाळेत येऊन समस्यांचे निराकरण करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांना पालकांनी चांगलेच धारेवर धरले होते.

शाळेच्या व्हरांड्याच्या बाहेर असणार्‍या सार्वजनिक शौचालयाच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थिनी, शिक्षिका आणि पालक त्रस्त झाले आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या व्हरांड्यात मुरूम, कच टाकावी, साचलेले सांडपाणी काढून द्यावे, गावठाणातून येणार्‍या पाण्याची विल्हेवाट लावावी अशा विविध मागण्या पालक करत आहेत. सोमवारपर्यंत मागण्या पुर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी ग्रामपंचायतीला दिला होता. शाळा व्यवस्थापनाने समितीचे अध्यक्ष सचिन ढोणे, उपाध्यक्ष दीपक ठेंबेकर, किसन शिंदे, गोरक्षनाथ खेडकर, लक्ष्मण शिंदे, प्रमोद शिंदे, वैशाली पिंगळे, शिल्पा सरोदे, अर्चना भोर, शामराव भोर, सुरेश वायाळ तसेच शिक्षकांशी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी चर्चा केली. त्यावेळी संतप्त पालकांनी पदाधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.