पद्मजा कुलकर्णी यांना ‘समर्पित सेवा जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान

0

आळंदी : विश्‍व शांती केंद्र, (आळंदी), श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विश्‍वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या 722 व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने भारूड सम्राज्ञी श्रीमती पद्मजा कुलकर्णी यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ लाखो वारकरी भाविक भक्तांच्या साक्षीने प्रदान करण्यात आला. माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण झाले.

देश विदेशात रोवला भारुडाचा झेंडा…

यावेळी ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, बाबा महाराज सातारकर यांची कन्या भगवती दांडेकर, चिन्मय महाराज सातारकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण उपस्थित होते. प्रा. कराड म्हणाले, श्रीमती पद्मजा कुलकर्णी यांनी भारूडाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककला केवळ भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार लंडन, श्रीलंकासहीत अनेक देशात नेऊन भक्ती परंपरेचा झेंडा रोवला आहे. भारूड म्हणजे नेमके काय, ते सादर कसे करायचे, याचे धडे त्यांनी अनेकांना शिकविले. त्या 74 वर्षाच्या असून सुद्धा आजही भारूडाचे कार्यक्रम सादर करून भागवत धर्माची पताका अखंडितपणे फडकत ठेवीत आहेत. त्यांच्या कार्यक्रमांची संख्या पाहून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने सुध्दा त्यांच्या नावाची दखल घेतली आहे.

जगभरात बाराशे कार्यक्रम…

श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, महाराष्ट्रातील लोककला भारूड ही संपूर्ण जगभरात पोहचविण्यासाठी तसेच ती जिवंत ठेवण्यासाठी विश्‍वामध्ये जवळपास 1200 कार्यक्रम केले. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारूडे लिहिली आहेत. ज्ञानेश्‍वर आणि नामदेव या एकनाथ पूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथानंतर झालेल्या संतांनी भारूडे लिहिली. त्याचेच सादरीकरण मी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.