पद्मभूषण माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन

0

नागपूर- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि मुंबई हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे आज गुरुवारी पहाटे ३ वाजता नागपूरमध्ये ९१ व्या वर्षी निधन झाले.

चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२७ रोजी मध्य प्रदेशमधील रायपूर येथे झाला. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. न्यायदानात त्यांनी मोलाचे योगदान दिले. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी दिलेले निकाल दिशादर्शक ठरले होते. २००३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेत त्यांनी पुस्तकांचे लिखाणही केले.

गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट स्मशानभूमीत दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.