मुंबई-पॅराजम्पिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध रेकॉर्ड बनवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भारताच्या पद्मश्री शीतल महाजन हिला फेडरेशन ऑफ आरोनॉटिकल इंटरनॅशनल (एफएआय)या संस्थेच्या वतीने इजिप्त येथे आंतराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सुवर्ण पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे.
फेडरेशन ऑफ आरोनॉटिकल इंटरनॅशनल ही संस्था जागतिक स्तरावर आकाशातील सर्व खेळाचे नियमन करणारी शिखर संस्था आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वत्तम कामगिरी करणाऱ्या जगभरातील 15 जणांना पुरस्कार देवून ती दरवर्षी सन्मानित करते. शीतल महजान हिला यंदाचा वर्षी एका वर्षात सहा खंडात स्काय डायविंग केल्याबद्दल सबिहा गोकसन गोल्ड मेडल पुरस्काररासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शीतल ही एफएआयचा पुरस्कार स्वीकारणारी पहिली भारतीय महिला आहे. तसेच एका वर्षात जगातील सहा खंडात स्काय डायविंग करणारी ती प्रथम महिला असून हा तिचा सहावा जागतिक विक्रम आहे.
यापूर्वी भारतातील जे.डी.आर टाटा (१९८४)यांना द एफएआय गोल्ड एअर मेडल,एफएआय ब्रॉंझ मेडल अतुल देव (१९९६), द पॉल तिसदीर डिप्लोमा पुरस्कार विश्वबंधु गुप्ता (१९८५), कॅप्टन सतीश शर्मा(१९८५), एफ.एच.इराणी (१९५८), आर.के.वासन (१९८९), द एफएआय एअर स्पोर्ट मेडल पुरस्कार अतुल देव (१९९४) आणि द मंगोलफिर बल्लूनिंग डिप्लोमा पुरस्कार विजयपत सिंघनिया (२००६) या आठ भारतीयांना एफएआय पुरस्काराने गौरविण्यात आले असून प्रथमच महिला भारतीय खेळाडूस या पुरस्काराने जागतिक पातळीवर सन्मानित करण्यात आले आहे.
एफएआय ही ऑलिम्पिकशी संलग्न संस्था असून वर्ल्ड ऐरो-स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा आणि जागतिक स्कायडायविंग स्पर्धा यांचे आयोजन ती करते. त्याचसोबत पराग्लायडिंग आणि हॉट एअर बलून व अशाप्रकारचे 14 ऐरो क्रीडाप्रकारांचे संयोजन करते. शीतल महाजन ही मूळ जळगावची रहीवाशी असून सध्या पुणे येथे असते , प्रसिद्ध कवियत्री बहिणाबाई चौधरी यांची ती नात आहे.