पद्मालय देवस्थान अध्यक्षपदी जैन

0

जळगाव । गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पद्मालय संस्थानच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची एकमताने निवड झाली. श्रीक्षेत्र पद्मालय येथे दि. 18 मे रोजी मंदीर विश्‍वस्तांची बैठक पार पडली. त्यात ही महत्त्वाची घोषणा संस्थानचे माजी अध्यक्ष अर्जुन पाटील व विद्यमान अध्यक्ष अमृत बुधो कोळी यांनी केली. बैठकीत उपस्थित असलल्या सर्व विश्‍वस्तांच्यावतीने नवनियुक्त अध्यक्ष अशोक जैन यांचा हृद्यसत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष आनंदराव पाटील, गोकुळ देशमुख, भिकाभाऊ पाटील, शिरीष बर्वे, डॉ.पी.जी. पिंगळे, राजेश तिवारी, अमित पाटील, गणेश वैद्य आदी मान्यवर विश्‍वस्त उपस्थित होते.

देवस्थान सुविधांनी विकसीत करणार
सभेत अन्य विषयांवर चर्चा होऊन मंजूरी देण्यात आली. श्रीक्षेत्र पद्मालयाच्या विकासासाठी भक्कम नेतृत्तवाची आवश्यकता असून त्यासाठी अशोक जैन यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी असा ठराव ज्येष्ठ सदस्य संस्थानचे अध्यक्ष अमृत कोळी यांनी मांडला. या ठरावास सर्व सदस्यांनी एक दिलाने मंजुरी दिली. अध्यक्ष म्हणून अशोक जैन यांची निवड व्हावी यास अर्जुन पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. श्रीक्षेत्र पद्मालयाच्या धार्मिक पर्यटन आणि अन्य महत्त्वाच्या सोयी सुविधा भाविकांना पुरविण्याच्यादृष्टीने पावले उचलली जातील. येणार्‍या पर्यटकास पद्मालयाचे पौराणिक महत्त्व चित्र व म्युरल प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसेल अशी व्यवस्था करण्यात येईल. हे देवस्थान सर्व सुविधांनी युक्त उत्तम लौकीक मिळविण्याच्या दृष्टीने विकसीत करण्यात येईल. यासाठी अध्यक्ष व संचालक मंडळ कटीबद्ध असेल असे अशोक जैन यावेळी म्हणाले.

ग्रामस्थांमध्ये समाधान
पद्मालय देवस्थान संस्थानचे विश्‍वस्त डॉ. पी.जी. पिंगळे यांचाही सत्कार करण्यात आला. गेल्या 25 वर्षांपासून डॉ. पिंगळे हे श्री क्षेत्र पद्मालय, श्री क्षेत्र मनुदेवी, नस्तनपूर आणि सप्तश्रुंगी देवस्थानला भाविकांसाठी मोफत उपचार औषधोपचार शिबीर उपक्रम चालवित आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल पद्मालय देवस्थानच्यावतीने मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अशोक पाटील डोमगांवकर, आनंद गुप्ते, पत्रकार शैलेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आगामी वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.