एरंडोल । ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्या तसेच देशभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानला जाणार्या रस्त्यावरील धोकादायक वळणावर संरक्षक कठडे बांधण्यात यावे अशी मागणी भाविकांनी केली आहे. सदरचा रस्ता वनखात्याच्या मालकीचा असल्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी तसेच संरक्षक भिंत बांधण्यासाठी वनखात्याने परवानगी द्यावी अशी मागणीही भाविकांनी केली आहे. एरंडोल येथून श्रीक्षेत्र पद्मालय येथे जाणार्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या मध्यभागी अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.रस्त्यावर तीन ठिकाणी लहान नाले असून पावसाळ्यात नाल्याच्या फरशी वरून पाणी वाहत असल्यामुळे भाविकांना दोन्ही बाजूस तासंतास ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे नाल्यांवर लहान पुलांची आवश्यकता आहे. पावसाळयात नाल्यातून पाणी वाहत असल्यामुळे भाविकांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते.
मोठी दरी असल्याने भविष्यात दुर्घटना होण्याची भीती
चतुर्थीला अनेक भाविक पायी गणपतीच्या दर्शनाला जात असतात. रस्त्याची रुंदी देखील कमी असल्यामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यास समस्या निर्माण होते. या रस्त्यावरील सुमारे एक किलोमीटर रस्ता वनखात्याचा मालकीचा असल्यामुळे रस्त्याची दुरुस्ती व रुंदी वाढविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत.तसेच वनखात्याच्या ताब्यात असलेल्या रस्त्यावरील धोकादायक असलेल्या वळणावर कोणतेही संरक्षक कठडे अथवा भिंत नसल्यामुळे अनेक वेळा वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात झाले आहेत. वळण रस्त्यावर एका बाजूस मोठा डोंगर असून दुसर्या बाजूस मोठी दरी असून भविष्यात मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी होण्याची भीती आहे. यापूर्वी अनेक दुचाकीस्वार वळण रस्त्यावरून खोल दरीत पडून गंभीर जखमी झाले आहेत. श्रीक्षेत्र पद्मालय येथे देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक चतुर्थीला विशेतः अंगारकी चतुर्थीला येणार्या भाविकांची संख्या मोठी असते. मात्र अनेक वाहन चालकांना वळण रस्त्याची माहिती नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण कमी असल्यामुळे तसेच परिसरात सर्वत्र घनदाट जंगल असल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास वेळेवर मदत मिळू शकत नाही.
खासदारांनी लक्ष देण्याची मागणी
रस्त्यावर वनखात्याची मालकी असल्यामुळे खासदार ए.टी.पाटील यांनी याबाबत लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी त्वरित लक्ष घालून रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तसेच धोकादायक वळणावर संरक्षक भिंत अथवा कठडे बांधण्यासाठी परवानगी देवून भाविकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाविकांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता सदरच्या रस्त्याचा काही भाग वनखात्याच्या मालकीची असल्याने धोकादायक वळणावर संरक्षक कठडे बांधण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.