अॅड. हरिश साळवेंना जीवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली/मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनात अनेक अडचणी अजूनही येतच आहेत. या चित्रपटाचे नाव पद्मावत करण्यात आले. राजकीय नेते आणि संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटातील अनेक दृष्ये कापण्यात आली तरी, पद्मावतचा वनवास संपण्याची चिन्हे नाहीत. आता भन्साळी आणि चित्रपट निर्मात्यांच्या बाजूने खटला लढणारे ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिश साळवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने पद्मावत चित्रपट सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेश दिल्यानंतरही गुजरातमधील मल्टिप्लेक्सनी चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यास नकार दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घटनांमुळे सर्वजणच घाबरले आहेत.
दूरध्वनीवर जीवे मारण्याची धमकी
पद्मावत चित्रपटाच्या बाजूने खटला लढल्यामुळे ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिश साळवेंना त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरु असून, त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. साळवेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर अनेकांचेच लक्ष करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कल्वी यांच्याकडे गेले. पण, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जबाबदार ठरवू नये असे म्हणत कल्वी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
कायदा, सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यांची!
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने चित्रपटाच्या टीमला दिलासा मिळाला असला तरीही चित्रपटाला होत असलेला विरोध कायम आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये असे म्हणत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रत्येक राज्याची आहे असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे गुजरातमधील मल्टिप्लेक्सनी चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यास नकार दिला आहे.
…आणि दीपिकाची कंबर झाकली
पद्मावत सिनेमातील घूमर गाण्याचे नव व्हर्जन शनिवारी रिलीज करण्यात आले. करणी सेनेच्या विरोधानंतर त्यांच्या सूचनांप्रमाणे गाण्यात बदल करण्यात आले आहेत. आधी या गाण्यात दीपिकाची कंबर दिसत होती. आता नव्या गाण्यात दीपिकाची कंबर झाकण्यात आली आहे. शिवाय, यूट्यूबवरूनही जुने गाणे हटवण्यात आले आहे. गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत होती, तेथे कम्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून ती झाकण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारच्या एडिटिंगमुळे गाण्याची कोरिओग्राफी बिघडेल. त्यामुळे दीपिकाची कंबर ग्राफिक्सद्वारे लपवण्यासाठी दिग्दर्शक भन्साळी तयार झाले. अखेर या बदलासह नवे गाणे रिलीज झाले आहे.