मुंबई : वादात सापडलेल्या ‘पद्मावत’ सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ट्विटरवर नवीन पोस्टर शेअर केले. या पोस्टरवर कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचा फोटो टाकण्यात आलेला नाही. पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीपासूनच हा सिनेमा वादग्रस्त ठरला होता.
सुरुवातीला करणी सेनेने केलेला विरोध, त्यानंतर सेन्सॉर बोर्डाची नाराजी, अशा विविध घटनांमुळे सिनेमा कात्रीत सापडला होता. सिनेमाच्या वादामुळे निर्मात्यांना याची प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलावी लागली होती. अखेर सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल केल्यानंतर या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. आता हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याच धर्तीवर दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने ट्विटरवर नवे पोस्टर रिलीज केले आहे.