‘पद्मावत’वर मध्यप्रदेश, गुजरातमध्ये बंदी

0

भोपाळ : सेन्सॉर बोर्डाने सुचविल्याप्रमाणे 300 बदल केल्यानंतरही निर्माता, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ’पद्मावत’ सिनेमामागचे शुक्लकाष्ठ काही जाताना दिसत नाही. आता राजस्थानपाठोपाठ मध्यप्रदेश आणि गुजरातमध्येही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. चित्रपटाचे नाव भलेही बदलले असेल; पण हा सिनेमा मध्यप्रदेशात प्रदर्शित होणार नाही, असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले. जे सांगितले ते सांगितले. मध्यप्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही. नाही म्हणजे नाही, असे चौहान यांनी नीक्षून सांगितले.

महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार?
पद्मावत सिनेमातील बदलांनंतरही राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातने सिनेमावर बंदी कायम ठेवली आहे. महाराष्ट्र सरकारची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. करणी सेनेचा पद्मावताला विरोध कायम आहे. शुक्रवारी सेन्सॉर बोर्डाबाहेर पद्मावत सिनेमाला विरोध करणार्‍या 96 लोकांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यावरून महाराष्ट्रातही पद्मावतला विरोध होईल अशीच शक्यता आहे.

राजपूत समाजाकडून स्वागत
’पद्मावत’ सिनेमामध्ये बदल करण्याआधी या चित्रपटावरून वाद सुरू असतानाही चौहान यांनी मध्यप्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी महाराणी पद्मावती यांना राजमातेचा दर्जाही दिला होता. त्याच बरोबर राज्यात ’पद्मावती’चे भव्य स्मारक बनविण्याची घोषणाही केली होती. त्यामुळे राजपूत समाजाने शिवराज सिंह चौहान यांचा भव्य सत्कारही केला होता. चौहान यांनी आता पुन्हा ’पद्मावत’ला विरोध केल्यानंतर त्याचे राजपूत समाजाने स्वागत केले आहे.