ठाणे । राणी पद्मावती यांच्या जीवनावर आधारित पद्मावती चित्रपटाला देशभरात विरोध होत आहे. शुक्रवारी ठाण्यातूनही या चित्रपटाला विरोध करण्यात आला. संजय लीला भन्साळी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पद्मावतीचे आक्षेपार्ह संवाद, राणी पद्मावती व अलाउद्दीन खिलजी यांच्यामध्ये सिन्स आणि नृत्य दाखवल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनही दिले आहे. या चित्रपटाच्या संदर्भात योग्य भूमिका घ्यावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील संघटनांनी दिला आहे. यावेळी त्यांनी पद्मावती सिनेमाच्या पोस्टरलादेखील फुली मारून निषेध केला. इतिहासतज्ञ आणि न्यायमूर्तींची एक समिती निर्माण करावी आणि या समितीनं या चित्रपटातील चुकीच्या दृश्यांना कात्री लावावी अशी मागणी या मोर्चातर्फे करण्यात आली.
पोलीस बंदोबस्तांत वाढ
ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास केल्याच्या आरोपांवरून पद्मावती चित्रपटाला विरोध होत आहे. या चित्रपटातून राणी पद्मिनीची मानहानी करण्यात आली आहे, असा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. राजपूत समाजानंही या चित्रपटाला आक्षेप घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चित्रपटगृह परिसरात पोलीस बंदोबस्तांतही वाढ करण्यात येणार आहे. राजस्थान राजपूत परिषद, रूद्र प्रतिष्ठान, मेवाड परिषद, राष्ट्रीय करनी सेना, मरवारिज इन ठाणे वेलफेअर, भूमिहार समाज, जैन श्वेतांबर तेरापंथी, ठाणे सिटी ज्वेलर्स असोसिएशन, अखिल भारतीय अगरवाल संमेलन अशा अनेक संस्था या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
भन्साळीं विरोधात घोषणाबाजी
राजपूत समाज आणि हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी राणी पद्मावती यांच्या जीवनावर आधारित पद्मावती या चित्रपटाला विरोध दर्शवत संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी काळ्या फिती बांधून ठाण्यातील कोणत्याही चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.