पुणे । पद्मावती परिसरातील वनशिव वस्ती परिसरात मेसाई देवीच्या पूजेनिमित्त दोन रेड्यांचा बळी देण्याचा डाव पोलिसांनी प्राणीमित्रांच्या सतर्कतने हाणून पाडला. पोलिसांनी घटनास्थळावरील दोन रेडे, बळी देण्यासाठी आणलेली हत्यारे, दोरखंड, दोन कुर्हाडी, पातेले असा ऐवज जप्त केला.सामाजिक कार्यकर्ते अमित शहा (वय 37) यांना शुक्रवारी (दि.10) काही इसम हे पद्मावती येथील वनशिव वस्ती परिसरात रेड्यांचे बळी देणार असल्याची माहिती मिळाली होती. याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी वनशिव वस्ती परिसरात धाव घेतली असता त्यांना मोकळ्या मैदानात काही लोकांनी तंबू टाकल्याचे आढळले. त्यामध्ये देवाचे फोटो होते आणि या तंबूसमोर हळद-कुंकू वाहिलेले आणि गळ्यात हार घातलेले दोन रेडे बांधले होते. हा सर्व प्रकार पाहून रेड्यांचे बळी देणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथील इसम पीटर पवार (45) याच्याकडे रेडे कशासाठी आणले याची विचारणा केली असता त्याने मेसाई देवीची पूजा असून रेड्यांचा बळी देणार असल्याचे सांगितले. रेडे कापण्याचा कायदेशीर परवाना नसल्याने पोलिसांनी रेड्यासहित घटनास्थळावरील साहित्य जप्त केले.