‘पद्मावती’ला विरोध हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला

0

मुंबई । पद्मावतीला होणारा विरोध हा सिनेसृष्टीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला केला जाणारा विरोध आहे. चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात निर्णय घ्यायला सेन्सॉर बोर्डाची निर्मिती केली आहे. मात्र पद्मावतीला होणारा विरोध पाहून याविरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे होते. या मुद्द्याकडे सरकारने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. या निमित्ताने चित्रपटसृष्टीला सुरक्षेचीही हमी हवी आहे, अशी थेट मागणी इफ्दा (इंडियन फिल्म्स एंड टेलिव्हिजन डायरेक्टर असोसिएशन) कडून आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतीसंदर्भात सुरू असलेल्या वादासंदर्भात इफ्दाने आपली भूमिका जाहीर केली.

हिंदु जनजागृती समितीची सेन्सॉर बोर्डाकडे धाव
हिंदु जनजागृती समितीच्या शिष्ट मंडळाने आज चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्डाच्या) मुख्य कार्यलयात जाऊन ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या विरोधात निवेदन दिले. या वेळी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजू वैद्य यांनी ते निवेदन स्वीकारले. या वेळी ‘पद्मावती’ चित्रपटासंदर्भात समाजभावना अतिशय तीव्र आहेत, आक्षेपांचे निरसन करण्यास सांगावे. त्यानंतरच चित्रपटाला प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी या वेळी करण्यात केली.

‘पद्मावती’साठी ज्येष्ठ अभिनेते सरसावले; सरकारकडून मदतीची अपेक्षा
चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर टीका तर होतच असते, पण आता लोक लाठ्या घेऊन आले आहेत. आता आम्ही कोणाकडे मदत मागायची, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असे प्रातिनिधिक मत यानिमित्ताने मांडण्यात आले. इफ्दाचे माजी अध्यक्ष अशोक पंडित यांनी कोणाचे पाऊल किती अपायकारक ठरेल याचा अंदाज येत नाही, त्यामुळे सरकारकडून मदतीची अपेक्षा असल्याचे सांगितले. या बैठकीसाठी चित्रपटसृष्टीतील विविध अंगांचे प्रतिनिधित्व करणारे कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. सुधीर मिश्रा, विक्रम गोखले, लाइट्स आणि स्पॉटबॉय असोसिएशनचे गंगेश्‍वर श्रीवास्तव यांनीही सुरक्षेची अपेक्षा व्यक्त केली आहे.